राज्यातील नाट्यमय संत्तातरणानंतर यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये कोण घेणार यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा वाद सुरु झाला आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून पार्कात मेळावा आम्ही घेणार असा दावा केला जात आहे. असं असतानाच आता या वादामध्ये आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी उडी घेतली आहे.
नक्की पाहा >> “मी आजही फोन उचलून थेट उद्धव ठाकरेंशी…”; राज ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला असता फडणवीसांचं विधान, शरद पवारांचाही केला उल्लेख
सोमवारी संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये तीन ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली. सोमवारी सुनावणीसाठी न्यायालयामध्ये आलेल्या संजय राऊत यांच्यासोबत त्यांचे बंधू विनायक राऊत आणि वकील होते. या व्यक्तीरिक्त न्यायालयामध्ये शिवसेनेचे नेते अनिल देसाई, चंद्रकांत खैरे यांनीही संजय राऊतांची भेट घेतली. यावेळी बोलताना दसरा मेळाव्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा सूचना संजय राऊतांकडून देण्यात आल्याचं समजतंय असं वृत्त ‘मुंबई तक’ने दिलं आहे.
नक्की वाचा >> “नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे…”; आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत रामदास कदमांचा टोला
दसरा मेळाव्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही मैदान उपलब्ध व्हावं यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवाजीपार्क मैदानावर मेळावा घेण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी हेच मैदान मिळावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर न्यायालयामध्ये भेटलेल्या नेत्यांसोबत संजय राऊत यांनी चर्चा करताना दसरा मेळाव्यासंदर्भात भाष्य केलं आहे. या विषयाबद्दल बोलताना संजय राऊत यांनी, “शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होतो ही परंपरा आहे. परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी पार्कामध्ये मेळावा घ्यावा” असा सल्ला दिला आहे.
नक्की वाचा >> …म्हणून फडणवीस शिंदे सरकारच्या कारभारावर नाराज, राष्ट्रवादीचा दावा; भाजपाला दिला सावध राहण्याचा इशारा
एकनाथ शिंदे आणि ४० समर्थक आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर यंदाचा दसरा मेळावा हा शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. त्यामुळेच आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा आणखीन मजबूत करण्यासाठी शिवाजीपार्कमध्येच दसरा मेळावा घेण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनंही दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजीपार्कमध्ये मेळावा घेण्यासाठी हलचाली सुरु केल्या आहेत. बीकेसीमधील मैदानावर मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाला एमएमआरडीने परवानगी दिली आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेने अद्याप शिवाजी पार्कसंदर्भात कोणताही निर्णय दिलेला नाही.