मुंबईमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळावे आज पार पडत आहेत. यासाठी दोन्ही बाजूने मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शक्तिप्रदर्शन करण्यासाठी दोन्ही गटांकडून मोठ्याप्रमाणात शहराबाहेरुन आणि महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून कार्यकर्त्यांना या मेळाव्यांसाठी बोलावण्यात आलं आहे. काल सायंकाळपासूनच राज्यातील वेगवगेळ्या भागांमध्ये दोन्ही गटांचे समर्थक मुंबईत दाखल होऊ लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत आज २० हजार पोलीस तैनात असतील. मात्र मुंबईमध्ये तरीही शिंदे गट आणि ठाकरे गटातील समर्थक आमने-सामने आल्यास पोलीस काय भूमिका घेणार यासंदर्भात सह पोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
नक्की वाचा >> Dasara Melava: “‘समृद्धी महामार्गा’वर सामान्यांना बंदी मग शिंदे समर्थकांना तो वापरण्याची परवानगी कोणी दिली? गुन्हे दाखल करा”
मंगळवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधताना विश्वास नांगरे पाटील यांनी दसरा मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना शहरातील सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील माहिती दिली. “दोन्ही मेळाव्यांसंदर्भात सविस्तर नियोजन करण्यात आलं आहे. यामध्ये गर्दीचं नियमन, ग्रामीण भागातून शिवसैनिक येणार आहेत त्यासंदर्भातील नियोजन करण्यात आलं आहे. या लोकांना रस्ते माहिती हवेत, पार्कींगची जागा, कुठे उतरायचं आहे, कुठे राहण्याची सोय आहे, बाहेरुन येणारे लोक आहेत या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. त्या अर्थाने नियोजन करण्यात आलं आहे,” असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले. तसेच, “कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने विनाकारण तणाव निर्माण होणार नाही, एकमेकांच्या समोर येणार नाही यासाठी रस्त्यांची विभागणी करण्यात आली आहे,” असं त्यांनी सांगितलं.
नक्की वाचा >> Dasara Melava: ‘उद्धव यांचं आमंत्रण आल्यास मेळाव्याला जाणार’ म्हणणाऱ्या राणेंना सेनेचं उत्तर; म्हणाले, “संध्याकाळपर्यंत…”
घातपातापासून संरक्षण करण्यासाठी सविस्तर नियोजन केलं असल्याचंही विश्वास नांगरे पाटील म्हणाले. “घातपात होऊ नये यासाठी क्यूआरटीची पथकं, बीबीडीएसच्या टीम सविस्तरपणे दोन्ही मैदानांमध्ये तैनात करण्यात आल्यात. या मैदानांची क्षमता आणि येणारे समर्थकांची संख्या पाहून वाहतूक नियोजन व्यवस्थितपणे केलं जाणार आहे. यासाठी वायरलेस यंत्रणा वापरली जाणार आहे. कारण मोठ्या प्रमाणात मोबाईल नेटवर्कवर प्रेशर येऊ शकेल. म्हणून ज्या ठिकाणी गर्दी जास्त होईल, प्रेशर पॉइण्ट अधिक होतील त्या ठिकाणी कसं डायव्हर्जन करता येईल याचं नियोजन वायरलेसवरुन करता येईल,” असं त्यांनी सांगितलं.
“वाहतूक आणि स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून सविस्तर नियोजन करण्यात आलं आहे. आम्ही गेले आठ दिवस काम करत असल्याने आमच्यावर सध्या खूप कमी ताण आहे. दोन दिवस अष्टमीची गर्दी सुद्धा दिसली. दसऱ्याच्या दिवशी आरएसएसच्या रॅली, देवीचं विसर्जन आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे लोकांची खरेदी याचं प्रेशर आणि दोन्ही मेळाव्यांना येणारे शिवसैनिक याचा कुठल्याही प्रकारचा तणाव होणार नाही,” असं विश्वास नांगरे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.
नक्की वाचा >> ‘‘खोके’वाल्यांचा अधर्म…’, ‘पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजपा…’; दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंकडून हल्लाबोल
‘वाहतूक कोंडी होऊ शकते. मात्र त्याचं नियोजन केलं आहे. सगळी मोकळी मैदानं पार्कींगसाठी वापरली जाणार आहेत. मोठ्या आणि छोट्या वाहानांसाठी वेगळी पार्किंगची मैदाने आहेत. ट्रेनच्या माध्यमातून येणाऱ्यांना विशेष सूचना. दिशादर्शक फलक लावण्यात आलेत. दोन्ही मेळाव्यांसाठी मोठ्या संख्येनं स्वयंसेवक उपलब्ध झाले आहेत. कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना जबाबदारी समजावून सांगण्यासाठी अगदी पीपीटी प्रेझेन्टेशनपासून अनेक गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं ब्रिफींग झालं आहे. आजी मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्र्यांच्या वाहतूक मार्ग ठरवण्यात आले आहेत,” असं वाहतूक नियोजनासंदर्भात माहिती देताना विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितलं.
पत्रकारांनी विश्वास नांगरे पाटील यांना, “काही अशी ठिकाणं आहेत की जिथे दोन्ही गटाचे समर्थक आमने-सामने येऊ शकतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर कलानगर. अशा ठिकाणी कशाप्रकारचं नियोजन करण्यात आलं आहे?” असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, “अशी अनेक ठिकाणं आहे. एमएमआरडी मैदानावर येणारी गर्दी ही ठाणे, औरंगाबाद आणि नाशिककडून येणार आहे. विशेष करुन ठाण्याकडून ही गर्दी येणार आहे. त्यांना रझाक जंक्शनवरुन डायव्हर्ट करुन कुर्ला रोड, बिकेसी कनेक्शन, पुलावरुन येणारी गर्दी आणि खालून जाणारी गर्दी याचं नियोजन केलं आहे. वाकोला जंक्शन, कलानगर जंक्शन या ठिकाणी नियोजन करण्यात आलं आहे. त्यांना व्यवस्थित मॉनटेर करण्यासाठी विशेष पद्धत वापरण्यात आली आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रत्येक २० ते २५ बसेसमागे एक असे कंट्रोल रुमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे क्रमांक देऊन नियोजन केलं आहे. त्यांना मॅप आणि गुगल मॅप पॉइण्ट पाठवलेत. त्यांच्या लिडर आणि स्वयंसेवकांशी चांगलं कॉर्डीनेशन आहे. पोलीस कंट्रोल रुमच्या माध्यमातून आपण नियोजन करणार आहोत,” असं विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलं.
नक्की वाचा >> Patra Chawl Case: संजय राऊतांना जामीन नाकारल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “काहीतरी कुठंतरी…”
सभेच्या ठिकाणी दोन्ही गटाचे समर्थक आमने-सामने येण्यासंदर्भातील शक्यतेबरोबरच पत्रकारांनी इतर ठिकाणी संघर्ष होऊ शकतो या अर्थानेही प्रश्न विश्वास नांगरे पाटील यांना विचारला. दोन्ही बाजूच्या गाड्या टोल नाक्यावर किंवा हॉटेलच्या ठिकाणी एकत्र आल्यास तिथे तणाव निर्माण होऊ शकतो, घोषणाबाजी होऊ शकते यासंदर्भात काय नियोजन आहे? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना, “हे पाहा असं होण्याची शक्यता कमी आहे. जरी झालं तरी तिथं आपण सामंजस्यच्या भूमिकेतून मध्यस्थी करणार आहोत. आपण यासाठी मोठी वहानं ठेवली आहेत. या दृष्टीने आपण प्रत्येक जंक्शनवर आपण लॉ आणि ऑर्डर रिझर्व्ह, स्ट्राइकिंग फोर्सेस एसआरपीएफच्या, डेल्टा फोर्सेस, मोठ्या गाड्या, लोकल पोलीसांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या आहेत. मला वाटतं नाही असं काही होईल कारण खूप सविस्तर नियोजन झालेलं आहे. लोकांचं सहकार्य मिळत आहे. दोन्ही मेळावा आयोजकांकडून पूर्ण सहकार्य मिळत आहे,” असं विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केलं.