मुंबई : शिवसेनेतील दोन गटांनी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या दसऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहे. बंडखोर आमदारांनी वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीएच्या मैदानात आयोजित केलेला दसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. तर ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी देवी विसर्जन असल्यामुळे मुंबईत तब्बल २० हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
एकाच वेळी होणाऱ्या दोन मेळाव्यांना कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. बंदोबस्तासाठी ३२०० अधिकारी, १५ हजार २०० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे १५०० जवान, एक हजार गृहरक्षक दल, शीघ्रकृती दलाची २० पथके, १५ बॉम्ब शोधक व नाशक पथके तैनात करण्यात येणार आहेत.याशिवाय नुकत्याच निवृत्त झालेल्या पोलिसांशीही संपर्क साधण्यात आला असून त्यांचीही बंदोबस्तासाठी मदत घेण्यात येणार आहे. सहआयुक्त पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह दोन्ही ठिकाणी भेटी देऊन पोलीस बंदोबस्ताच्या तयारीची पाहणी केली.
दोन्ही गट यावेळी शक्ती प्रदर्शन करणार असल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिंदे गट आणि आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत. त्याच दिवशी देवींचे विसर्जनही आहे. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून दोन्ही गटांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत येणार आहेत. त्यामुळे मुंबई वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी दादर येथील स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, केळुसकर मार्ग, एम. बी. राऊत मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, दादासाहेब रेगे मार्ग, दिलीप गुप्ते मार्ग, एन. सी. केळकर मार्ग व एल. जे. मार्ग येथे वाहने उभी करण्यास बंदी केली आहे. त्याऐवजी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील कौटुंबिक न्यायालयापासून कुर्ल्याकडे मार्गावर वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच संत ज्ञानेश्वर मार्ग, प्राप्तीकर जंक्शन, सुर्वे जंक्शन, रझाक जंक्शन, एमटीएनएल जंक्शन, चुनाभट्टी येथील उड्डाणपुलावरून बीकेसीला येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. फक्त मेळाव्यासाठी जाणाऱ्या वाहनांना या मार्गिकांवरून प्रवेश देण्यात येणार आहे. इतर वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दोन्ही मेळाव्यासाठी येणारी वाहने उभी करण्यासाठी दादर व वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
वाहनांना प्रवेश बंदी असलेल मार्ग व पर्यायी मार्ग
दादर
१. स्वातंत्र वीर सावरकर मार्ग (सिद्धी विनायक मंदिर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन) पर्यायीमार्ग :– सिध्दिविनायक मंदिर जंक्शन, एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोतुर्गीज चर्च, गोखले रोड या रस्त्याचा वापर करावा.
२. राजाबढे चौक जंक्शन ते केळुस्करमार्ग उत्तर जंक्शन येथपर्यंत. पर्यायीमार्गः– एल. जे. रोड, गोखले रोड-स्टिलमॅन जंक्शनवरून पुढे गोखले रोडचा वापर करतील.
३. दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथून दक्षिण वाहिनी.पर्यायीमार्ग – राजा बढे जंक्शन येथून एल. जे. रोडचा वापर करावा.
४. गडकरी चौक येथृून केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर. पर्यायीमार्गः- एम. बी. राऊत मार्गाचा वापर करावा.
५. दादासाहेब रेगे मार्ग, सेनापती बापट पुतळा येथून गडकरी जंक्शनपर्यंत.
६. बाळगोविंद दास मार्ग, पद्माबाई ठक्कर मार्ग जंक्शन सेनापती बापट रोडपासून पश्चिम दिशेला एल. जे. मार्गापर्यंत.
बीकेसी
-पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलींककडून वांद्रे-कुर्ला संकुल परिसर कुर्लाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना कौटुंबिक न्यायालय जंक्शनकडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.
-संत ज्ञानेश्वर मार्गावरून कुर्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना प्राप्तीकर जंक्शनकडून पुढे वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातून कुर्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी प्रवेश बंदी.
-खेरवाडी शासकीय वसाहत कनाकिया पॅलेस, वाल्मिकी नगरकडून पुढे वांद्रे-कुर्ला संकुल परिसर, चुनाभट्टी, तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी प्रवेश बंदी.
-सुर्वे जंक्शन व रजाक जंक्शनवरून बिकेसी परिसर, धारावी, वरळी सिलींकच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना एमटीएनएल जंक्शन येथून प्रवेश बंदी.
-पूर्व द्रुतगती महामार्ग, चुनाभट्टी येथून वांद्रे-कुर्ला संकुलाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना कनेक्टर ब्रिज चढण दक्षिण वाहिनी येथून जाण्याकरीता प्रवेशबंदी.