शिवसेना पक्षस्थापनेपासून दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कवर पार पडत होता. पण, गेल्यावर्षी शिवसेनेत दोन गट पडले. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. तर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची बीकेसी मैदानात सभा पार पडली. यंदाही महिनाभर आधी ठाकरे आणि शिंदे गटानं शिवाजी पार्क मैदानाची परवानगी मिळण्यासाठी मुंबई महापालिकेकडं अर्ज दाखल केले आहेत.
महापालिकेनं २०२२ मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला परवानगी देण्यासाठी टाळाटाळ केली होती. यानंतर ठाकरे गटानं थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर न्यायालयानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी परवानगी देण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. यंदाही शिवाजी पार्कचं मैदान मिळवण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटात चूरस लागली आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे नेते महेश सावंत यांनी सांगितलं, “शिवसेनेचा दसरा मेळावा पारंपरिक आहे. गेल्यावर्षी महापालिकेनं दसरा मेळाव्यासाठी आम्हाला खूप त्रास दिला. शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला परवानगी दिली नाही. मात्र, न्यायदेवतेनं न्याय दिल्यावर दसरा मेळावा थाटामाटात साजरा झाला.”
“यंदाही दीड महिन्यापूर्वीच महापालिकेला मैदानासाठी अर्ज केला आहे. वॉर्ड अधिकारी सपकाळे यांनी विधी विभागाकडे अहवाल पाठवल्याचं सांगितलं आहे. एक-दोन दिवसांची वाट पाहू,” असं सावंत यांनी म्हटलं. आमदार सदा सरवणकर यांनीही एक महिन्यापूर्वी अर्ज केला आहे. याबद्दल विचारल्यावर महेश सावंत म्हणाले,
“मागील वर्षीही त्यांनी अर्ज केला होता. पण, न्यायदेवतेनं आम्हाला न्याय दिला. शिवसेनेला लढाई नवीन नाही. २०२२ मध्ये आम्ही कुठंलेही मैदान आरक्षित केलं नव्हतं आणि यंदाही करणार नाही. शिवाजी पार्कवरच आमचा मेळावा होणार, ही १०० टक्के खात्री आहे.”