|| शैलजा तिवले
‘डेटा इंट्री ऑपरेटर’ची मुदत संपुष्टात
नायर रुग्णालयात राबविण्यात येणाऱ्या रुग्णालय माहिती व्यवस्थापन प्रणालीच्या (एचएमआयएस) प्रक्रियेत डॉक्टरांच्या मदतीसाठी दिलेल्या डेटा इंट्री ऑपरेटरचा कालावधी मंगळवारी समाप्त झाला. त्यामुळे पुढील काळात ही प्रणाली राबविणे रुग्णालयासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे मुळातच संथगतीने सुरू असलेली एचएमआयएसची अंमलबजावणी रखडण्याची शक्यता आहे.
पालिकेने नायर रुग्णालयात ही प्रणाली राबविण्यास साधारण वर्षभरापूर्वी सुरुवात केली होती. डॉक्टरांना प्रत्यक्ष माहिती भरणे सोईचे नसल्याने पालिकेने ६२ ऑपरेटरची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली होती. या कंत्राटाची मुदत ३० एप्रिल रोजी संपुष्टात आली. परंतु अद्यापही अनेक तांत्रिक अडचणी डॉक्टरांना येत असल्याने मदतीसाठी असणारे ऑपरेटर गेल्यानंतर ही प्रणाली कशी राबवावी, असा प्रश्न रुग्णालयापुढे उभा राहिला आहे.
सध्या रुग्णालयात रोज जवळपास दीड हजार रुग्ण दाखल होतात. पावसाळ्यात ही संख्या दोन हजारांवर जाते. त्या वेळी रुग्णाची तपासणी आणि सोबतच या प्रणालीमध्ये माहिती भरणे ही कामे करणे अवघड होईल. तेव्हा ऑपरेटरची किमान पुढील काही महिने आवश्यकता असल्याचे मत रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केले.
रुग्णालयात नव्या आणि जुन्या रुग्णांची नोंद करण्यासाठी पालिकेचे आठ कर्मचारी कार्यरत आहेत. इथेही आत्तापर्यंत ऑपरेटर मदतीला होते. रुग्णांचा भार अधिक असल्याने नोंदणी करण्यास वेळ लागतो आणि रांगा लागतात. म्हणून मंगळवारी शेवटच्या दिवशीही तीन ऑपरेटर मदतीला पाठविण्यात आले होते. या प्रणालीच्या माध्यमातून नोंदणी करणे आता बंधनकारक असल्याने या कामासाठी आणखी किमान आठ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. सध्या तातडीने चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ते गुरुवारपासून रुजू होतील, अशी माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली. तसेच ऑपरेटच्या मुदतीमध्ये काही महिने वाढ करावी, अशी मागणीही पालिकेकेडे केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नोंदणी विभागात १५ जणांची नियुक्ती
नायर रुग्णालयात १५ आणि कस्तुरबा रुग्णालयात ५ अशा एकूण २० ऑपरटेरची नोंदणी विभागामध्ये नियुक्ती केली आहे. त्यामुळे उर्वरित विभागामध्ये ऑपरटेरची मुदतवाढ केलेली नाही आणि ती करण्याचाही अद्याप विचार नाही, असे अतिरिक्त आयुक्त आश्विनी जोशी यांनी सांगितले.
तीन वेळा नोंदी
रुग्णालयातील जवळपास सर्व बाह्य़रुग्ण विभागांत ही प्रणाली असून गेल्या महिनाभरापासून डॉक्टर स्वत: रुग्णांच्या माहितीची नोंद करत आहेत. परंतु एका रुग्णाची नोंद रुग्णालयाच्या नोंदवहीत, रुग्णाच्या पेपरवर आणि एचएमआयसच्या संगणकावर अशी तीन वेळा करावी लागते. त्यामुळे वेळ लागतो. सर्व साधारणपणे १२ ते १ दरम्यान संपणारे बाह्य़रुग्ण विभागातील काम सध्या संध्याकाळी चापर्यंत सुरू राहत आहे. परिणामी डॉक्टरांवरील कामाचा ताण वाढलाच आहे, शिवाय सकाळी आलेल्या रुग्णांना संध्याकाळपर्यंत ताटकळत राहावे लागते.