दहा वर्षांपूर्वीच्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’प्रकरणी सदोष मनुष्यवधाच्या नव्याने लावण्यात आलेल्या आरोपाविरोधात अभिनेता सलमान खान याने सत्र न्यायालयात केलेल्या अपिलावरील सुनावणी सोमवारी २९ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. न्यायाधीश सुट्टीवर असल्याने सलमानविरोधात नव्या आरोपाअंतर्गत दाखल खटल्याची सुनावणी तहकूब झाली. परिणामी दहा वर्षे उलटली तरी ‘तारीख पे तारीख’चा सिलसिला सुरूच आहे.
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्यूस व पाचजणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली सलमानवर सुरुवातीला बेदरकारपणे गाडी चालविल्याप्रकरणी खटला चालविण्यात आला. मात्र नंतर त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा नवा आरोप लावण्यात येऊन तसेच आरोपाचे गांभीर्य लक्षात घेऊन वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांनी खटला सत्र न्यायालयात वर्ग केला. त्याला सलमानने सत्र न्यायालयातच आव्हान दिले आहे. त्यामुळे वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या त्याच्या अपिलावरील आणि नव्याने दाखल केलेल्या खटल्यावरील सुनावणी एकत्रित सुरू आहे.

Story img Loader