मुंबई : राज्यात विविध शहरात सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक निधीच्या साहाय्याने मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र दरवर्षी गोव्यात होणाऱ्या इफ्फीच्या (आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव) धर्तीवर राज्यातही आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली होती. या महोत्सवाच्या तारखा जाहीर झाल्या असून येत्या २१ ते २४ एप्रिल दरम्यान मुंबईत हा महोत्सव होणार आहे.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून सूत्रे हातात घेतल्यानंतर आयोजित केलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत ॲड. आशिष शेलार यांनी राज्य सरकारच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव भरवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. ‘गेल्या ६० वर्षापासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. मात्र शासनाचा अधिकृत असा चित्रपट महोत्सव आयोजित केला जात नाही. तसेच, राज्यात विविध ठिकाणी विविध संस्था आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करतात. या महोत्सवासाठी राज्य सरकार दरवर्षी १० लाख रुपये ते ४ कोटी रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य करते. मात्र यावर्षीपासून राज्य सरकार अधिकृतरित्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करणार आहे, असे ॲड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार, बुधवारी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने त्यांच्या विविध समाज माध्यमावरून २१ ते २४ एप्रिल दरम्यान हा महोत्सव होणार असल्याचे जाहीर केले आहे.

मुंबईत यावर्षी पहिला महोत्सव होणार असून जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत ते या महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत. याशिवाय, आंतरराष्ट्रीय महोत्सवा प्रमाणेच प्रत्येक चित्रपट प्रदर्शना नंतर त्या चित्रपटाच्या चमुशी संवाद साधण्यात येणार आहे. काही विशेष परिसंवाद, चित्रपट अभ्यासकांच्या मुलाखती अशा स्वरूपात हा राज्य चित्रपट महोत्सव होणार आहे. या महोत्सवाच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ सांभाळणार आहे. हा महोत्सव मुंबईत कुठे होणार? कोणकोणत्या मराठी चित्रपटांचा महोत्सवात सहभाग असेल? इथपासून ते या महोत्सवासासाठी प्रवेश अर्ज निर्मात्यांनी कुठे? कसे भरावेत यासंदर्भातील नियमावली आदी तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. दरवर्षी राज्य सरकारकडून ‘पिफ’सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपट महोत्सवांना पाठबळ दिले जाते. तसेच, कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म बाजारमध्येही सरकारच्या वतीने तीन मराठी चित्रपट पाठवले जातात. मात्र, संपूर्णत: राज्य सरकारचे आयोजन असलेला अशापध्दतीच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाची मुहूर्तमेढ यावर्षी पहिल्यांदाच रोवली जाणार आहे.