मुंबई : दरवर्षी ४५० हून अधिक परीक्षा घेणाऱ्या मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गतच्या उन्हाळी सत्रातील विविध २९९ परीक्षांच्या तारखा शुक्रवारी जाहीर केल्या. उन्हाळी सत्राअंतर्गत मानव्य विद्याशाखा व विधी शाखेच्या ६९, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या ५७, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या ७५ आणि आंतर विद्याशाखेच्या ९८ परीक्षा होणार आहेत. उन्हाळी सत्रातील या विविध परीक्षांना २ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार आहेत. तर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गतची तृतीय वर्ष बी.कॉम. सत्र ६ ची परीक्षा २२ मार्च, तृतीय वर्ष बी.ए. व बी.एस्सी. सत्र ६ ची परीक्षा ३ एप्रिल, बी.ए.एमएमसी सत्र ६ ची परीक्षा १६ एप्रिल, बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स, आयटी व बायोटेक सत्र ६ ची परीक्षा १९ एप्रिल आणि बी.कॉम. अंतर्गत स्वयंअर्थसहाय्य अभ्यासक्रम असणाऱ्या फिनांशियल मार्केटस, बँकिंग ॲन्ड इन्शुरन्स, अकाऊंटिंग ॲन्ड फायनान्स, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, फिनांशियल मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट व बी.एम.एस. सत्र ६ ची परीक्षा ही १५ एप्रिलपासून सुरु होणार आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिली.

हेही वाचा – मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित, आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान

हेही वाचा – मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

परीक्षांच्या तारखांसह पदवी परीक्षेच्या सत्र ६ च्या सर्व परीक्षांचे वेळापत्रकही विद्यापीठाच्या https://mu.ac.in/ या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आले आहे. इतर परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात करण्यात येणार आहे. उन्हाळी सत्राची परीक्षा देणाऱ्या २ लाख विद्यार्थ्यांपैकी १ लाख ७६ हजार विद्यार्थ्यांना जानेवारी महिन्यातच आसन क्रमांक देण्यात आले आहेत. तसेच परीक्षेची प्रवेशपत्रेही तयार झाली आहेत, ही प्रवेशपत्रे लवकरच महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये देण्यात येतील. परीक्षा विभागातील परीक्षा व निकाल विभागाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाणे व त्यांच्या विभागाने आणि संबंधित विद्याशाखेच्या अधिष्ठात्यांनी या परीक्षांच्या तारखांचे वेळापत्रक तयार केले आहे. हे वेळापत्रक तयार करताना विद्याशाखांचे ९० दिवसांचे सत्र, सुट्ट्या व इतर विविध व्यावसायिक परीक्षांचाही विचार करण्यात आला आहे. ‘उन्हाळी सत्राच्या परीक्षा नियोजित वेळेवर घेणे, वेळेत मूल्यांकन करणे आणि निर्धारित वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे’, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदाळे यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dates of 299 exams of mumbai university summer session announced more than 2 lakh students will give the exam mumbai print news ssb
Show comments