शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव यांना अमेरिकेत येण्यासाठी विनंती करण्याची आणि तेथे त्यांची आमच्याकडून योग्य ती काळजी घेण्यात येईल, असे उद्धव ठाकरे यांचे जनसंपर्क अधिकारी राजाराम रेगे यांना सांगण्यात आल्याचा खुलासा हेडली याने या वेळेस केला. परंतु या ‘दोघांची काय काळजी घेण्यात येईल’ म्हणजे काय करण्यात येणार होते याचा खुलासा मात्र त्याने केला नाही.
शिवसेनाभवनाच्या पाहणीच्या वेळेस संपर्कात आलेले रेगे हे नंतरही ‘ई-मेल’च्या माध्यमातून संपर्कात होते. आपल्यासोबत व्यवसाय करायचा होता. मात्र रेगेंचा वापर शिवसेनाप्रमुख यांच्या हत्येच्या कटासाठी होऊ शकतो हे लक्षात घेऊन साजिद मीर आणि मेजर इक्बाल यांना त्यांची माहिती दिली होती. तसेच रेगेंचा कसा उपयोग करून घेता येऊ शकतो याबाबत या दोघांसह डॉ. तहव्वूर राणा यांच्याकडेही चर्चा केल्याचे हेडलीने स्पष्ट केले. मात्र या तिघांमध्ये त्यावरून मतभेद होते. रेगेंकडून लष्कराची गोपनीय माहिती इक्बालला हवी होती, साजिद, पाशा आणि मला हल्ल्यासाठी त्यांचा उपयोग करून घ्यायचा होता, तर राणाला व्यवसाय करून पैसे मिळवायचे होते.
उलटतपासणीवरून खडाजंगी
माफीचा साक्षीदार म्हणून हेडलीची साक्ष पूर्ण करत असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जाहीर केले. त्यानंतर न्या. जी. ए. सानप यांनी खटल्यातील आरोपी अबू जुंदाल याचे वकील वहाब खान यांना हेडलीची उलटतपासणी करणार का म्हणून विचारणा केली. त्यावर खान यांनी तयारी दाखवत हेडलीची साक्ष, अजमल कसाबची साक्ष आणि खुद्द जुंदालचा जबाब यांचा एकत्रित अभ्यास केल्यावरच हेडलीची उलटतपासणी घेऊ शकतो, असे स्पष्ट केले आणि सुनावणी तहकूब करण्याची मागणी केली. मात्र सुनावणी प्रलंबित करण्याचा बचाव पक्षाच्या वकिलांच्या या क्लृप्त्या आहेत, असे सुनावत न्यायालयाने सुनावणी तहकूब करण्यास नकार दिला. अभ्यास केल्याशिवाय उलटतपासणी कशी काय घेऊ शकतो, याचा पुनरुच्चार करून खान यांनी न्यायालयाकडे सुनावणी तहकूब करण्याची पुन्हा विनंती केली. त्याला निकम यांनीही जोरदार विरोध केला. मात्र नंतर अमेरिकेच्या जिल्हा अॅटर्नी सारा यांच्याकडे उलटतपासणी सुरू ठेवता येऊ शकेल, अशी विचारणा केल्यावर त्यांनी त्याला होकार दिला. मात्र ती पुढच्या आठवडय़ात घेता येऊ शकणार नाही. त्यामुळे ती घेण्यासाठी किती वेळ वा दिवस लागणार आणि त्याची तारीख सांगण्याचे सारा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे न्यायालयाने उलटतपासणीची सुनावणी तहकूब करत खान यांना २२ फेब्रुवारी रोजी उलटतपासणीचे वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले.
दुसरे म्हणजे खान यांनी हेडलीला तो हिंदी भाषेत साक्ष देऊ शकतो का, अशी विचारणा केली. त्यावर आपल्याला काहीच हरकत नसल्याचे हेडलीने स्पष्ट केले. तुम्हाला इंग्रजी भाषेतच त्याची उलटतपासणी घ्यावी लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र कनिष्ठ न्यायालयांची भाषा ही मराठी असून ती समजण्यात अडचण असलेल्यांना हिंदी वा इंग्रजी भाषेचा पर्याय उपलब्ध असल्याचा युक्तिवाद खान यांनी केला. त्यावर न्यायालयाने उलटतपासणी इंग्रजीतूनच होईल हे आपले आदेश आहेत, असे बजावत वादाला पूर्णविराम दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा