२६/११ मुंबई हल्ला तपासाला वेग
पाकिस्तानातील सूत्रधारांचा शोध सुलभ
मुंबईसह देशाला हादरवणाऱ्या आणि जगभर दहशतवादाविरोधात तीव्र पडसाद उमटविलेल्या २६/११ मुंबई हल्लाप्रकरणी पाकिस्तानी वंशाचा अमेरिकी अतिरेकी डेव्हिड हेडली याला गुरुवारी विशेष न्यायालयाने माफीचा साक्षीदार बनविले आहे. सध्या याच हल्ल्यांवरून अमेरिकेत तुरुंगवास भोगत असलेल्या हेडलीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे खटल्यात सहभाग घेत आपल्यावरील आरोप मान्य असल्याचे सांगितले. तसेच माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केली. सरकारने ती मान्य केल्याने या हल्ला तपासाला वेगळे वळण मिळाले असून या कटाच्या पाकिस्तानातील सूत्रधारांचा शोधही सुलभ होणार आहे.
हल्ल्याची सर्व माहिती देण्याची व सर्वतोपरी सहकार्य करण्याची विशेष न्यायालयाने घातलेली अट त्याने मान्य केल्यानंतर त्याला माफीचा साक्षीदार केले गेले. आता ८ फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीत तो माफीचा साक्षीदार म्हणून सहभागी होणार आहे. मुंबई हल्लाप्रकरणी हेडलीला अमेरिकन न्यायालयाने ३५ वर्षांचा तुरुंगवास ठोठावला आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या या हल्ल्यात १६६ जण मृत्युमुखी पडले होते.
मुंबईवरील हल्ला प्रकरणातील आरोपी अबु जुंदाल याच्यासह हेडलीलाही या प्रकरणी आरोपी बनवण्याची सरकारी पक्षाची मागणी न्यायालयाने मान्य केली होती. तसेच त्याला हजर करण्याबाबत समन्स बजावले होते. त्यानुसार गुरुवारी हेडलीला ‘व्हिडिओ कॉन्फरन्िंसग’द्वारे विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. माफीचा साक्षीदार होण्याचा प्रस्ताव त्याने ठेवला. त्यावर विशेष सरकारी वकीलांनी विचार करण्यासाठी वेळ मागून घेतली. त्यानंतर अध्र्या तासाने पुन्हा सुनावणी सुरू झाली आणि हेडलीला माफीचा साक्षीदार बनवण्यासाठी सरकार तयार असल्याचे सांगण्यात आले. हेडलीनेही न्यायालयाच्या सर्व अटी मान्य असल्याचे वकिलांच्या मार्फत सांगितले व सुनावणीदरम्यान सर्व बाबींच्या नोंदीची आणि आदेशाची प्रत आपल्याला उपलब्ध करण्याची विनंती न्यायालयाकडे केली.
हेडलीला घातलेल्या अटी
’हल्ल्याशी संबंधित सर्व घटनाक्रम आणि इत्यंभूत सत्य परिस्थिती न्यायालयाला सांगावी.
’हल्ल्यातील त्याची भूमिका तपशीलवार स्पष्ट करावी.
’हल्ल्यातील लष्कर-ए-तोयबासह अन्य दहशतवादी संघटनांचा तपशील सांगावा.
’माफीचा साक्षीदार म्हणून सरकारी वकिलांकडून विचारल्या जाणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील.