मुंबई : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) यंदा तब्बल १५ लाख ७० हजार कोटी रुपये गुंतवणुकीसाठी विक्रमी सामंजस्य करार झाले असून त्यातील ९८ टक्के गुंतवणूक ही विदेशी असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केला. यातून १५ लाख ९५ हजार रोजगारनिर्मितीची अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली.
आर्थिक परिषदेचा समारोप झाल्यानंतर दावोस येथून दृकश्राव्य माध्यमातून पत्रकार परिषद घेताना फडणवीस यांनी यंदा झालेल्या करारांबाबत सविस्तर माहिती दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ५० ते ७५ हजार कोटी रुपये गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार झाले असले तरी प्रत्यक्षात ३५ ते ४० टक्के करारांचीच अंमलबजावणी झाली. मात्र गेल्यावर्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या करारांची ९५ टक्के अंमलबजावणी झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. गडचिरोलीसह राज्याच्या सर्व विभागांमध्ये आणि कृषीप्रक्रिया, सौर, संरक्षण, विद्याुत वाहने आदी अनेक क्षेत्रांमध्ये करार झाले असून समतोल विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. परिषदेत गुंतवणुकीचे ५४ आणि धोरणात्मक भागीदारीचे सात करार झाले. टाटा, रिलायन्ससह अनेक उद्याोगसमूह भारतातील असले, तरी त्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यांच्याबरोबर अन्य देशांमधील भागीदार असून त्यांच्यासमवेत चर्चेसाठी दावोसमधील परिषदेचे व्यासपीठ आहे. त्यादृष्टीकोनातूनच मॅग्नेटिक महाराष्ट्र, व्हायब्रंट गुजरातसारख्या परिषदांचेही आयोजन केले जाते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा : रखडलेली पशुगना ४२ टक्क्यांवर; जाणून घ्या आढावा बैठकीत सचिवांनी काय आदेश दिले
नवी मुंबईत ‘इनोव्हेशन सिटी’
नवी मुंबईत इनोव्हेशन सिटी उभारणार असून ती जगभराशी जोडलेली असेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर पुढील काळात वाढणार असून राज्य सरकारने ‘गुगल’शी शासकीय पातळीवर तंत्रज्ञान वापरण्याबाबत करार केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्यांचे स्वरुपही बदलणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
एक तृतीयांश गुंतवणूक मुंबई-पुण्यात
जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने केलेल्या १५ लाख ७० हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या करारांपैकी एकतृतीयांशहून अधिक म्हणजे सुमारे सहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण व पुणे क्षेत्रात होणार आहे. उत्तर महाराष्ट्रात ३०-३५ हजार कोटी, मराठवाड्यात २०-२५ हजार कोटी रुपये गुंतवणूक होणार आहे.
हेही वाचा : Shivaji Park Mumbai : एमपीसीबीकडून पुढील आठवड्यात शिवाजी पार्क धुळीचा आढावा
संकेतस्थळावर माहिती – सामंत
फडणवीस यांच्या आधीच्या कार्यकाळापासून म्हणजे २०१५पासून आतापर्यंत दावोसमध्ये झालेले सामंजस्य करार आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊन सुरु झालेले उद्याोग याचा संपूर्ण तपशील महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) संकेतस्थळावर काही दिवसांत उपलब्ध करुन देण्याचा सरकार प्रयत्न करणार असल्याचे उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. यंदा केलेल्या करारांची अंमलबजावणी केली जाईल व टीकाकारांना संधी दिली जाणार नाही, असे ते म्हणाला.
यंदा झालेली ९८ टक्के गुंतवणूक विदेशी आहे. या करारांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल व उद्याोग सुरू होतील. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. विरोधकांना गुंतवणूक आणणे जमले नसल्याने ते असुयेपोटी टीका करीत आहेत. मात्र जनता सरकारच्या कामामुळे समाधानी आहे. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
हेही वाचा : Himalayan Vulture : उरणमध्ये हिमालयीन गिधाडाला जीवदान
विरोधकांची टीका
नाशिक / मुंबई : दावोसमध्ये करार झालेल्या २९पैकी फक्त एकच परदेशी कंपनी असून १५ कंपन्यांचे मुख्यालय मुंबईतच असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. तर आमदार रोहित पवार यांनीही मुंबई-पुण्यातील कंपन्यांबरोबर करार करण्याकरिता दावोसला जाण्याचे कारण काय, असा सवाल केला.