मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) इतिहास घडला असून महाराष्ट्राने दोन दिवसात १५.७० लाख कोटी रुपये गुंतवणुकीसाठी एकूण ५४ सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. या गुंतवणुकीतून १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होईल.
दावोस येथे बुधवारच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा ठरला. पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्याोगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात रिलायन्स उद्याोगसमूहाकडून तीन लाख पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यापैकी बहुतांश गुंतवणूक सेवा क्षेत्रात होणार असून, त्यातून तीन लाख रोजगार निर्मिती होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरवर नेण्याचे फडणवीस यांचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले. दुसरी मोठी गुंतवणूक ही अॅमेझॉन करणार असून, ती सुमारे ७१ हजार ७९५ कोटी रुपये इतकी आहे. ‘एमएमआर’ क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून होणाऱ्या या गुंतवणुकीतून ८३,१०० इतके रोजगार निर्माण होणार आहेत. राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून, समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे.
टोनी ब्लेअर यांच्याबरोबर चर्चा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ते भारताला भेट देण्यासाठी उत्सुक असून देशाच्या प्रगतीसंदर्भात आणि राज्यातील सार्वजनिक वाहतूक किमान ५० टक्के हरित ऊर्जेवर चालविण्यासाठी काय करता येईल, महाराष्ट्रातील ऊर्जानिर्मिती ४८ गिगावॉटवरून ७८ मेगावॉट करणे, आदी बाबींविषयी विचारविनिमय करण्यात आला. तसेच फडणवीस यांनी काल्सबर्ग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेकब अरुप अँडरसन यांच्याशी चर्चा केली असून, समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली.
हेही वाचा : Heli Tourism : राज्यात ‘हवाई पर्यटना’ला चालना
महाराष्ट्र-फिनलंड व्यापारी संबंधांबाबत चर्चा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. फडणवीस यांनी फिनलंडचे वाणिज्यमंत्री विले ताविओ यांची भेट घेऊन महाराष्ट्र-फिनलंडमधील व्यापारी संबंधांबाबत चर्चा केली. फिनलंडमध्ये ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र रोडशो’चे आयोजन करण्यात येणार असून, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, रसायने, खते क्षेत्रात गुंतवणुकीबाबत उभयपक्षी सहकार्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही फडणवीस यांनी भेट घेतली. टाटा समूह ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.