‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ हे वर्णन सार्थ ठरविणारे राज्यातील विविध गड, किल्ले हे संपूर्ण महाराष्ट्राचे ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभव सध्या भग्नावस्थेत आहे. दुर्लक्षित असलेल्या गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन याबाबत समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘दुर्गसंपत्ती परिवारा’तर्फे दरवर्षी दिवाळीत ‘एक पहाट रायगडावर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
यंदा २२ व २३ ऑक्टोबर रोजी रायगडावर ‘दीपोत्सव’साजरा करण्यात येणार असून यंदा उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाची नवीन पिढीला ओळख करून द्यावी आणि संपूर्ण महाराष्ट्र दिवाळी साजरी करत असताना हिंदवी स्वराज्याची राजधानी ‘रायगड’ अंधारात राहू नये, येथेही दिव्यांची रोषणाई व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. रायगडावर होणाऱ्या यंदाच्या कार्यक्रमास सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे उपस्थित राहणार असून दुर्गसंवर्धन चळवळीतील मिलिंद क्षीरसागर यांचे व्याख्यानही होणार आहे. गेल्यावर्षी २०० जण या कार्यक्रमात सहभागी झाले होते, अशी माहितीही ‘महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती’ परिवाराचे निखिल साळसकर यांनी ‘लोकसत्ता’ ला दिली.  या आगळ्या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी मोठय़ा संख्येने प्रत्यक्ष उपस्थित राहावे. सहभागी मंडळींनी येताना एक पणती व मशाल घेऊन यावी.
ज्यांना प्रत्यक्ष सहभागी होणे शक्य नाही त्यांनी पणती व मशाल देऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन दुर्गसंपत्ती परिवाराने केले आहे. अधिक माहिती ‘फेसबुक’ या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर ‘महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती’ समुहावर मिळू शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा