दाऊदबंधू अनीस इब्राहिमचा व्यापाऱ्याच्या हत्येचा कट 

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम याला दुबईतील ‘हॉट खनी’ने पुरते बेचैन केले आहे. दुबई, पाकिस्तान आणि अन्य देशांत ‘फायर’ गुटख्याची विक्री करणाऱ्या अनीसचा व्यवसाय गुजरातमधील एका उत्पादकाच्या ‘हॉट खनी’मुळे घसरू लागल्यामुळे त्याने या उत्पादकाच्या हत्येचा कट रचला; परंतु राजकोट पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनीस इब्राहिमकडून सुपारी घेऊन आलेल्या चौघांना अटक करण्यात आली. या घटनेनंतर अंडरवर्ल्ड आणि गुटखा व्यवसाय यांच्यातील लागेबांधे पुन्हा एकदा समोर आले आहेत.

अनीस इब्राहिम हा ‘फायर’ नावाच्या गुटख्याच्या निर्मिती व्यवसायात आहे. पाकिस्तानात ‘फायर’ या नावाने विकला जाणारा हा गुटखा पाकिस्तानबाहेर ‘गोवा’ या नावानेही विकला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानसह दुबई आणि अन्य मध्यपूर्वेतील देशांमध्ये गुटखाविक्री क्षेत्रात अनीसची मक्तेदारी होती. मात्र, अलीकडच्या काळात दुबईतून उत्पादित होणाऱ्या ‘हॉट खनी’ नावाच्या गुटख्याने अनीसची ही मक्तेदारी मोडीत काढली आहे. सफदर खत्री (३२) हे या गुटख्याचे निर्माते असून त्यांचे काका अश्फाक इस्माईल खत्री (५५) हे गुजरातमधून गुटखानिर्मितीसाठी आवश्यक कच्चा माल सफदर यांना पुरवतात. ‘हॉट खनी’ची विक्री झपाटय़ाने वाढू लागली असून त्याचा मोठा फटका अनीसच्या ‘फायर’ला बसला आहे.

याआधीही व्यापाऱ्यावर हल्ला

गुन्हे शाखेतून मिळालेल्या माहितीनुसार अनीसने दहशतीच्या जोरावरच पाकिस्तान, मध्यपूर्वेत गुटख्याचा व्यवसाय सुरू केला. उत्पादनासाठी लागणारी यंत्रसामग्री त्याने भारतातील व्यापाऱ्यांकडून मिळवली होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार २०००च्या सुमारास एका औषध उत्पादक व्यावसायिकाच्या हत्येचा प्रयत्न अनीसने केला होता. या हल्ल्यातून व्यावसायिक बचावला, मात्र त्याला कायमचे अपंगत्व आले होते.