मुंबईः आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग करण्यात आल्याबद्दल समाज माध्यमांवर चर्चेला उत आला होता. मात्र मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यात तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले. गेल्या आठवड्यात दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी गेला होता. पण सध्या तो घरीच असल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापूर्वीही अनेक वेळा दाऊदच्या मृत्यूबाबतच्या खोट्या बातम्या पेरण्यात आल्या होता. पाकिस्तानातील समाज माध्यमांवरील वाहिन्यांनी दाऊद इब्राहिम रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती दिल्यामुळे दिवसभर या विषयी चर्चे सुरू होती. पाकिस्तानात दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग करण्यात आला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यात देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली. त्यामुळे भारतातील विविध यंत्रणा या प्रकरणाची पडताळणी करण्यात व्यस्त होते. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेसह गुन्हे शाखनेही दाऊदवरील विष प्रयोग व रुग्णालयात दाखल केल्याच्या वृत्ताची पडताळणी केली. त्यात दाऊद टोळीशी संबंधित, तसेच दाऊद कुटुंबियांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींकडून माहिती घेण्यात आली. त्यानंतर दाऊदवरील विष प्रयोगाचे वृत्त चुकीचे असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – मोबाइल चोरणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात

प्रकृती ठिक नसल्यामुळे दाऊद वैद्यकीय तपासणीसाठी गेल्या आठवड्यात पाकिस्तानातील एका रुग्णालयात गेला होता. पण सध्या तो पाकिसानातील घरी असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वीही अनेक वेळा दाऊद इब्राहिमच्या मृत्यूबाबतच्या खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीही दाऊदला करोना झाला असून त्यात त्याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. दाऊदच्या मृत्यूबाबतही अनेक वेळा अशा अफवा पसरल्या होत्या. दाऊदच्या हालचालींवर भारतीय यंत्रणा नियमित लक्ष ठेऊन असतात. वयस्कर झालेला दाऊद मधुमेहसह इतर आजारांनी त्रस्त आहे. त्यामुळे नियमित तपासणीसाठी त्याला रुग्णालयात जावे लागत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. दाऊदचे पाकिस्तानातील राहण्याचे ठिकाणही बदलण्यात आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. दाऊद इब्राहिमचा पुतण्या आणि हसिना पारकरचा मुलगा अली शाह याने राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) चौकशीत दाऊदच्या नवीन घराबाबतची माहिती दिली होती.

हेही वाचा – केंद्राच्या आक्षेपांमुळे डॉ. रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती रखडली?

दाऊद सध्या कराचीत अब्दुला गाजीबाबा दर्ग्याच्या मागच्या बाजूला असलेल्या रहीम फाकी परिसरातील संरक्षण खात्याच्या ताब्यातील जागेत राहत आहे. एवढी वर्ष दाऊद डी १३, ब्लॉक-४, कराची डेव्हलपमेंट अथॉरिटी, स्कीम-५, क्लिफ्टन कराची येथे राहत होता. पण सुरक्षेच्या दृष्टीने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी त्याचे घर बदलल्याचे बोलले जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dawood ibrahim poisoned news is rumor last week dawood was in the hospital for a check up ssb