मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना मंगळवारी २० वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांचे कुटुंबीय आणि जखमी अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. वाईट गोष्ट म्हणजे न्याय कधी मिळेल याची कोणतीही शाश्वती नाही.
चार वर्षांपूर्वीच्या मुंबई हल्ल्यातील अजमल कसाबला फाशीची शिक्षा होऊन फासावरही लटकविण्यात आले. तर त्याही आधीच्या संसदेवरील हल्ल्याचा आरोपी अफजल गुरुसुद्धा यमसदनी गेला. परंतु मुंबईला अक्षरश: मुळापासून हादरविणाऱ्या आणि संपूर्ण जीवनच बदलून टाकणाऱ्या या साखळी बॉम्बस्फोटांचे आरोपी मात्र अद्याप फासावर लटकलेले नाहीत. तर या कटाचे मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम, टायगर मेमन हाती लागलेले नाहीत.
१९९३ चे बॉम्बस्फोट म्हणजे देशावरील पहिला दहशतवादी हल्लाच मानला जातो. अभिनेता संजय दत्तसह सीमाशुल्क विभागाचे अधिकारी, पोलीस दलातील अधिकारीही बॉम्बस्फोटासाठी पाठविण्यात आलेला शस्त्रसाठा मुंबईत सुखरूप पोहोचविण्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली दोषी ठरलेले आहेत.
खटल्याचे स्वरूप, आरोपींची संख्या, साक्षीपुराव्यांचा पसारा यामुळे खटला १३ वर्षांहून अधिक काळ सुनावणीच्या प्रक्रियेत खोळंबला होता. या खटल्यात पहिले आरोपपत्र बॉम्बस्फोटांनंतर नऊ महिन्यांनी, ४ नोव्हेंबर १९९३ रोजी सुमारे १८९ आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आले. त्यानंतर वेळोवेळी २३ पुरवणी आरोपपत्रे दाखल करण्यात आली. १३ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर विशेष ‘टाडा’ न्यायालयाने प्रत्यक्ष खटला चालविण्यात आलेल्या १२३ पैकी १०० जणांना दोषी धरून शिक्षा सुनावली, तर २३ जणांची निर्दोष मुक्तता केली. १०० पैकी १२ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यात टायगर मेमनचा भाऊ याकूबसह बॉम्ब पेरणाऱ्या ११ जणांनाही फाशीची शिक्षा सुनावली होती. याशिवाय विविध प्रकारे या कटात सहभागी असलेल्या २० जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
यांना फाशीची शिक्षा
याकूब मेमन, शोएब घन्सार, असगर मुकादम, शाहनवाज कुरेशी, अब्दुल गनी तुर्क, परवेज शेख, मोहम्मद इक्बाल मोहम्मद युसुफ शेख,  मोहम्मद फारूख पावले, मुश्ताक तरानी, झकीर हुसैन, अब्दुल अख्तर खान आणि फिरोज अमानी मलिक.
या २० जणांना जन्मठेप
इसा मेमन, युसूफ मेमन, रुबीना मेमन, बशीर खैरुल्ला, नसीम बरमारे, इम्तियाज घावटे, मोईन कुरेशी, दाऊद फणसे, सीमाशुल्क अधिकारी एस. एन. थापा यांच्यासह २० जणांना फाशीची शिक्षा झाली. कर्करोगामुळे थापाचा मृत्यू झाला.
जामिनावरील एकमेव आरोपी
संजय दत्तसह त्याचे तीन मित्र युसूफ नळवाला, केरसी अदजानिया, रुसी मुल्ला यांनाही संजयकडील एके-५६ रायफल लपविण्याच्या आणि त्याची विल्हेवाट लावल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने दोषी धरले. न्यायालयाने संजयला प्रतिबंधित शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी धरून ६ वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच त्याची जामिनावर सुटका केली. आरोपींनी शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर संजयला सर्वोच्च न्यायालयानेही जामीन मंजूर केला. सहा वर्षांची शिक्षा झाल्यानंतरही आणि कुठलेही आजारपणाचे कारण नसतानाही जामिनावर बाहेर असलेला तो एकमेव आरोपी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा