संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याने मुंबईतील आपल्या कोटय़वधींच्या बेनामी मालमत्तेच्या संरक्षणासाठी आता इक्बालपाठोपाठ मुस्तकीन आणि हुमायून या दोघा बंधूंना परत पाठविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दुबईमार्गे या बंधूंना भारतात धाडले जाण्याची शक्यता आहे. या दोघांविरुद्ध भारतीय तपास यंत्रणांकडे गुन्हे दाखल नसल्यामुळे या दोघांचा परतीचा मार्ग सुरळीत असेल असे तपास यंत्रणांना वाटत आहे.
आपल्याला भारतात परतणे शक्य नाही, हे लक्षात आलेल्या दाऊदने सुरुवातीला इक्बालला धाडले. मात्र सारा-सहारा व्यापारी संकुलप्रकरणात इक्बालला तुरुंगात जावे लागले. मात्र त्यातून बाहेर पडल्यानंतर इक्बालने पाकमोडिया स्ट्रीटवर आपले बस्तान बसविले. दक्षिण मुंबईत दाऊदच्या नोंदीवर नसलेल्या अनेक साथीदारांनी बांधकाम व्यवसायात आपले पाय पसरविले आहेत. इक्बालही त्याच मार्गाने जात असून आता तो पूर्णपणे स्थिरावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच दाऊदने आता मुस्तकीन आणि हुमायून या दोघांना धाडण्याचे ठरविले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दाऊद टोळीतील म्होरके कमालीचे शांत झाले आहेत. आता मुस्तकीन आणि हुमायून परतत असतानाही कुठलीही गडबड नको, म्हणून दाऊदनेच टोळीच्या म्होरक्यांना थंड राहण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने मात्र त्यांची कुंडली काढण्यास सुरुवात केली आहे. हे बंधू स्थिरावल्यास दाऊद टोळी सक्रिय होऊ शकेल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
कोण आहेत हे हुमायून-मुस्तकीन?
हुमायून हा दाऊदचा सर्वात छोटा भाऊ तर मुस्तकीन हा कासकर बंधूमध्ये शेवटून दुसरा. सर्वात मोठा भाऊ शब्बीर टोळीयुद्धाचा बळी ठरला तर नुराचा आजारपणाने मृत्यू झाला. अनिस हा दाऊदसमवेत कराचीत असल्याचे सांगितले जाते. इक्बाल अगोदरच मुंबईत परतला आहे तर बहीण
हसीनाआपा मुंबईतच वास्तव्याला आहे.