मुंबई : देशात व राज्यात कर्करुग्णांची वेगाने वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने राज्यात कर्करोग निदान व उपचारासाठी विविध योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून या अंतर्गत टाटा कॅन्सर सेंटर बरोबर सामंजस्य करार करून राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये डे-केअर केमोथेरपी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये कर्करोग निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २७ कर्करोग निदान रुग्णवाहिका घेण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही वर्षात देशात कर्करुग्णांचे प्रमाण वाढत असून २०२२ मध्ये १४ लाख ५० हजार एवढे कर्करुग्ण होते, ते २०२५ मध्ये वाढून त्यांची संख्या १५ लाख ७० हजार एवढी होईल, अशी भिती नॅशनल कॅन्सर रजीस्ट्रीच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. देशात २०१२ मध्ये सात लाख ८९ हजार लोकांचा कर्करोगाने मृत्यू झाला, तर २०२२ मध्ये यात वाढ होऊन आठ लाख आठ हजार लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. देशभरात दररोज कर्करोगामुळे २६,३०० लोक मृत्युमुखी पडतात. या पार्श्वभूमीवर केंद्र शासानाने देशपातळीवर कर्करोग निदान व उपचाराचा कार्यक्रम राबिवण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा – पिंपरी- चिंचवडकरांना आणखी किती दिवस दिवसाआड पाणी? प्रशासनाची मोठी माहिती

महाराष्ट्रातही २०२० मध्ये कर्करोगाच्या एक लाख १६ हजार १२१ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. २०२५ पर्यंत एक लाख ३० हजार रुग्ण असतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. राज्यात तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या कर्करुग्णांमध्ये पुरुषांचे प्रमाण ४०.६ टक्के, तर महिलांमध्ये प्रमाण १५.६ टक्के आहे. याशिवाय पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण ११.१० टक्के, फुफ्फुसाच्या कर्करोगाचे ८.४ टक्के तर प्रोस्टेट कर्करुग्णांचे प्रमाण ७ टक्के आहे. स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २९.९ टक्के, गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण ११ टक्के, तर ओव्हरीच प्रमाण ६.०३ टक्के एवढे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कर्करुग्णांचे प्रमाण वेगवेगळ्या कारणांमुळे वाढत असल्याचे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने कर्करोग निदान व उपचाराच्या सुविधा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यात टाटा कॅन्सर सेंटरच्या मदतीने आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्करोग प्रतिबंध, निदान आणि उपचाराबाबत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम तसेच जिल्हा रुग्णालयाअंतर्गत शल्यचिकित्सक, स्त्ररोगतज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक तसेच अन्य विशेषोपचार तज्ज्ञांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आरोग्य विभागाने २०१८-१९ मध्ये दहा जिल्ह्यांमध्ये डे-केअर केमोथेरपी केंद्र सुरू केले होते. सध्या १३ जिल्ह्यांमध्ये ही सुविधा असून आगामी काळात ३५ जिल्ह्यांमध्ये डे-केअर केमोथेरपी सुविधा सुरू करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतला आहे. यादृष्टीने आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांना टाटा कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. सध्या राज्यात अमरावती, गडचिरोली, भंडारा, सिंधुदुर्ग, सातारा, नाशिक, पुणे, जळगाव, अकोला, वर्धा, रत्नागिरी, बीड व नंदुरबार या ठिकाणी डे-केअर केमोथेरपी केंद्र सुरू असून राज्यातील सुमारे सव्वालाख कर्करुग्णांचा विचार करून या योजनेचा विस्तार करण्यात येत आहे.

हेही वाचा – पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना धमकी

यासाठी आरोग्य विभागाने आगामी २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ३५ कोटी रुपयांची तरतूद मागितली आहे. प्रत्येक जिल्ह्यात १५ खाटांचे डे-केअर केंद्र प्रस्तावित असून या केंद्राच्या बांधकाम तसेच उपकरणे, औषधोपचार यासाठी ही ३५ कोटींची मागणी करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. टाटा कॅन्सर हॉस्पीटलच्या मार्गदर्शनानुसार ही केंद्रे जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, स्त्री रुग्णालये तसेच उपजिल्हा रुग्णालय स्तरावर सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय ग्रामीण जिल्ह्यांमध्ये कर्करोग निदान मोठ्या प्रमाणात करण्यासाठी ३५ जिल्ह्यांकरीता कर्करोग निदान रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२३-२४ मध्ये आठ रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या असून आगामी अर्थसंकल्पात २७ कर्करोग निदान रुग्णवाहिका घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी २७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कर्करोग निदान व उपचारांची व्यवस्था वाढविणे ही काळाची गरज आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यात निदान झाल्यास कर्करोगावर मात करणे शक्य आहे. तसेच वाढते कर्करोगरुग्ण लक्षात घेऊन काही योजना आम्ही मांडत आहेत. ज्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल. केमोथेरपीसाठी डे-केअर केंद्र ही मोठी गरज आहे. याचा विचार करून योजना मांडण्यात येत आहे. – आरोग्यमंत्री तानाजी सावंत

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Day care chemotherapy centers in 35 districts of maharashtra of health department mou with tata cancer centre mumbai print news ssb