कुलदीप घायवट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोड गळयाचा पक्षी म्हणून सर्वज्ञात कोकीळ आहे. मात्र सुमधुर आवाज ही दयाळाचीही ओळख आहे. त्याचा आवाज अगदी स्पष्ट आणि खणखणीत असतो. गोड आवाजात लांब शीळ तो घालतो. सकाळी व तिसऱ्या प्रहरी दाट, विरळ झाडाझुडपांतून मनप्रसन्न करणारा, लयबद्ध असा आवाज कानावर पडतो तो बहुतेकवेळा दयाळचा असतो.

दयाळ इतर पक्ष्यांचेही आवाज काढू शकतो. मनुष्यवस्तीच्या आसपास किंवा वनात एकटा किंवा जोडीने दयाळ आढळतो. झुडपामधून वावरताना तो ‘स्वीई स्वीई’ असा आवाज अधूनमधून काढतो. विणीच्या हंगामात त्याचा आवाज अधिक मंजूळ होतो. दयाळ बुलबुलएवढा, सुमारे १९-२० सेंमी लांबीचा असतो. नराचे डोके, मान, पाठ, छाती काळय़ा रंगाची असते. पोट पांढरे असते. शेपूट लांब असते. पंखांवरील काही पिसे पांढरी असतात. मादीचे डोके, मान, पाठ तपकिरी रंगाची असते. मादीच्या पंखांवर नराप्रमाणे पांढरा पट्टा असतो. डोळे तपकिरी, चोच व पाय काळे असते. दयाळ संकटाची जाणीव करून देणारा, सावधानतेचा इशारा देणारा, विनंती करणारा, घाबरलेला अशा अनेक परिस्थितीनुसार इशारा देतो. निरनिराळय़ा प्रकारची मधुर शिळ घातल्यासारखे त्याचे गाणे असते. भक्षकाची चाहूल लागताच समूहातील इतर पक्ष्यांना सतर्क राहण्याचा इशारा देतो. दयाळाचे शास्त्रीय नाव ‘कॉप्सिकस सॉलॅरिस’ आहे. यासह त्यांच्या मधूर आवाजावरून आणि रंगावरून विविध नावे पडली आहेत. दयाळ पक्ष्यांच्या काळय़ा पिसांमध्ये पांढऱ्या पिसांची छटा असल्याने, त्याला संस्कृतमध्ये ‘दाधिक’ म्हटले जाते. दाधिक म्हणजे दही विकणारा. पंखावरील पांढऱ्या पट्टय़ामुळे त्याला ‘दाधिक’, ‘दहीगोल’, ‘दहेंडी’, ‘दहियर’, ‘दहियल’ असे म्हटले जाते. उसळी, खापऱ्या चोर, सुई, सुईन अशीही त्याची स्थानिक नावे आहेत. यासह दयाळ घोडय़ासारखा शेपटी उडवत असल्याने त्याला ‘अश्वक’, ‘अश्वाख्य’; काळया रंगाचा असल्याने ‘काबरो’, ‘कालाचिडी’, ‘कालो करालो’, ‘काळचिडी’, ‘कालकंठ’, ‘कॉप्सिकस’ असेही म्हटले जाते.

हेही वाचा >>> राज्यात यंदा चाऱ्याची तीव्र टंचाई ; उपाययोजनांसाठी कृतीदलाची स्थापना  

दयाळ श्रीलंका, सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया, फिलिपीन्स आणि बांगलादेश येथे आढळतो. तो बांगलादेशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. भारतात डोंगराळ भागात १,२२० मी. उंचीपर्यंत तो सापडतो. राजस्थानमधील रखरखीत प्रदेश सोडल्यास देशभरात तो आढळतो. मुंबईतील मनुष्यवस्तीतील बागा, जंगले, कांदळवनात दयाळ दिसून येतात. परसबागेत अनेकदा दयाळ शेपटी उडवीत भक्ष्य शोधताना दिसून येतो. त्याचे प्रमुख अन्न हे टोळ, नाकतोडे आणि इतर कीटक आहे. यासह शेवरीच्या आणि पांगाऱ्याच्या फुलांतला मधुरस तो पितो. लहान सरडे, रसाळ फळे, मासे खातो. भक्ष्य मिळविण्याकरिता जमिनीवर उतरून तो इकडे-तिकडे फिरत असतो. तो तुरूतुरू चालतो आणि थांबल्यावर शेपटीला झटका देऊन ती उभारतो. त्याला झाडीत राहायला आवडते. एरवी गोड गाणारा दयाळ विणीच्या हंगामात अत्यंत भांडखोर होतो. इतर जातभाईशी स्पर्धा करतो. मादीला आकर्षित करण्यासाठी तो गातो. दयाळ झाडांच्या ढोलीत, घराच्या कोनाडय़ात गवत, लहान काडय़ा, धागे, मऊ पिसांपासून घरटे बांधतात. अंडी घालण्यापूर्वी एक आठवडा घरटे बांधण्याचे काम सुरू होते. त्यांची फिकट निळसर हिरव्या रंगाची अंडी असून त्यावर तांबूस ठिपके असतात. अंडी उबविण्याचे काम मादी करते. पिलांचे संगोपन नर-मादी दोघेही करतात. दयाळ पक्ष्याचा आर्युमान हे साधारण १० वर्षांचे असते.