‘ऐतिहासिक’ डीसी लोकल कुल्र्याजवळ धूळ खात उभी; गर्दुल्ले, दारुडे व अनैतिक व्यवसाय करणाऱ्यांचा मोकाट वावर
अवघ्या काही दिवसांपूर्वी ‘एका युगाचा अस्त, डीसी लोकलची शेवटची ऐतिहासिक धाव’ अशा मोठमोठय़ा शब्दांमध्ये वर्णन करून मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर चालवलेली शेवटची डीसी लोकल सध्या कुर्ला स्थानकाजवळ धूळ खात उभी आहे. या गाडीतील काही डबे स्मरणचिन्ह म्हणून मध्य रेल्वेवरील स्थानके तसेच दिल्ली येथील राष्ट्रीय रेल्वे वस्तुसंग्रहालयात ठेवण्याचे दावे करणाऱ्या रेल्वेने तूर्तास मात्र या लोकलला वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे वेश्या व्यवसाय, गर्दुल्ले, दारुडे यांच्यासाठी ही ‘ऐतिहासिक’ लोकल सुरक्षित अड्डा बनली आहे.
हार्बर मार्गावर डीसी-एसी परिवर्तनाच्या कामावेळी मध्य रेल्वेने डीसी प्रवाहावर धावणारी शेवटची गाडी मोठा गाजावाजा करत चालवली. १९२५ पासून म्हणजे गेली ९१ वष्रे हार्बर मार्गावर डीसी विद्युतप्रवाहावर गाडय़ा धावत होत्या. शेवटच्या डीसी गाडीला निरोप देण्यासाठी मध्य रेल्वेने या गाडीचे तिकीट १० हजार रुपये ठेवण्याचा प्रकारही करून बघितला. प्रत्यक्षात एकही तिकीट खपले नाही.
आता या शेवटच्या डीसी गाडीच्या शेवटच्या फेरीला २० दिवस उलटूनही ही गाडी अद्यापही कुर्ला स्थानकाजवळ उभी ठेवण्यात आली आहे. या गाडीच्या खिडक्यांना बांधलेले हार व फुले सुकलेल्या अवस्थेत तसेच आहेत. गाडीच्या प्रत्येक डब्यात कुठे वापरून फेकून दिलेले निरोध, बीअरच्या बाटल्या पडलेल्या दिसतात. त्याशिवाय मलमूत्र विसर्जनासाठीही या गाडीच्या डब्यांचा वापर सर्रास होत असल्याचे आढळते. काही डब्यांमध्ये विडी-सिगारेटची थोटके, काडेपेटीची रिकामी डबी व वापरलेल्या काडय़ाही आढळतात.
‘दिल्ली अभी दूर हैं’
या गाडीचे तीन डबे दिल्लीच्या राष्ट्रीय रेल्वे वस्तुसंग्रहालयात ठेवण्यासाठीची प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी आहे. त्यासाठी हे डबे मध्य रेल्वेला अजून काही वष्रे जपून ठेवावे लागतील. गाडीचे परीक्षण करून काही चुकीच्या गोष्टी आढळल्यास ही गाडी ताबडतोब हलवली जाईल.
– ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे