मुंबई : बारामती मतदारसंघातील मतदान पार पडल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत कुठे, असा प्रश्न विचारला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील बुधवारच्या दौऱ्याच्या वेळीही अजित पवार अनुपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदी यांच्या राज्यातील दौऱ्याच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस हे उपस्थित असतात. सुरुवातीच्या काही सभांना अजित पवार उपस्थित होते. पण बारामती मतदारसंघाच्या प्रचारात अजित पवार यांनी बारकाईने लक्ष घातले होते. त्यांनी बारामतीमध्येच ठाण मांडले होते. परिणामी उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार असतानाही अजित पवार उपस्थित नव्हते. राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल हे उपस्थित होते. बुधवारी दिंडोरीत झालेल्या सभेला राष्ट्रवादीच्या वतीने छगन भुजबळ तर कल्याणमध्ये सुनील तटकरे हे उपस्थित होते. पण अजितदादा कुठेच दिसले नाहीत. मुंबईतील रोडे शोच्या वेळीही अजित पवार उपस्थित नव्हते. तसेच पंतप्रधन मोदी यांनी मंगळवारी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी ‘रालोआ’च्या घटकपक्षाचे नेते उपस्थित होते. मात्र तिकडे अजित पवार फिरकले नाहीत.

हेही वाचा >>> ‘व्होट जिहाद’चा काँग्रेसचा डाव! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघाती आरोप

नाशिक जिल्ह्यात अजितदादांच्या गटाची चांगली ताकद आहे. जिल्ह्यातील चार आमदार अजितदादांबरोबर आहेत. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला होता. छगन भुजबळ यांनी लोकसभा लढण्याची तयारीही केली होती. पण महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळू शकला नाही. नाशिक जिल्ह्यात पक्षाचे चांगले संघटन असतानाही अजित पवार यांची अनुपस्थिती खटकणारी होती.

भाजप नेत्यांची नाराजी

बारामतीमधील मतदान पार पडताच अजित पवार यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या शरद पवारांबद्दल केलेल्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ‘शरद पवार यांना आम्हाला संपवायचे आहे’ या पाटील यांच्या विधानावर पवार यांनी आक्षेप घेतला होता. तसेच या विधानामुळे नकारात्मक वातावरण निर्माण झाल्यानेच चंद्रकांत पाटील यांना बारामतीपासून दूर ठेवण्यात आले, असेही पवार म्हणाले होते. बारामतीवरून अजित पवार यांनी मतदान पार पडल्यावरच भाजपवर खापर फोडले होते. पुण्यातील भाजप नेत्यांनी अजितदादांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm ajit pawar not reachable since after baramati constituency polling zws
Show comments