मराठा आरक्षणाला आक्रमकपणे विरोध करणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्तेंविरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातच सदावर्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माणूस असल्याचाही आरोप वारंवार होत असतो. या पार्श्वभूमीवर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच या आरोपावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते शनिवारी (२८ ऑक्टोबर) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझा गुणरत्न सदावर्तेंशी काही संबंध नाही. मी स्पष्टपणे सांगतो की, ते जे काही बोलतात त्याला माझं अजिबात समर्थन नाही. सदावर्ते जे बोलतात ते असमर्थनीय आहे.”

“गुणरत्न सदावर्तेंशी माझा संबंध नाही”

“सदावर्ते कुणाचा माणस आहे हे मला माहिती नाही. त्यांचा कुणी वापर करतंय की, ते स्वतः बोलत आहेत मला माहिती नाही. मात्र, त्यांच्याशी माझा संबंध नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

“मी ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातं”

देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले, “मी ब्राह्मण आहे आणि मी माझी जात बदलू शकत नाही. मराठा समाजाच्या नावाने ज्यांनी फक्त राजकारण केलं असे लोक मला टार्गेट करतात. त्यांना माहीत आहे की मी सॉफ्ट टार्गेट आहे याला टार्गेट करा अशी मानसिकता त्यांची दिसते.”

“एकच आरक्षण हायकोर्टात टिकलं, ते मराठा आरक्षण होतं. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात ते चाललं. मी मुख्यमंत्री असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नाही. सर्वोच्च न्यायालयात नंतर काय घडलं हे सगळ्यांना माहीत आहे. आपले वकील सांगायचे आदेश मिळाला नाही. आपल्या वकिलांनी सांगितलं भरती थांबवतो,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

हेही वाचा : “एकनाथ शिंदे अपात्र झाले तरीही तेच मुख्यमंत्री राहणार”, फडणवीसांनी सांगितला ‘प्लॅन बी’, म्हणाले…

“काय काय कसं कसं घडलं ते सगळ्यांना माहीत आहे. जेव्हा एखाद्या श्रेय देता येत नाही तेव्हा त्याचं श्रेय काढून घेण्याचा प्रयत्न केला जातो. मनोज जरांगे पाटील यांनाही अशाच कुणीतरी हे सांगितलं असावं. मला टार्गेट करण्याचं एकच कारण आहे. १९८० मध्ये आरक्षणासाठीची लढाई सुरु झाली. ८२-८३ मध्ये अण्णासाहेब पाटील यांचा जीव गेला. कायद्याने टिकणारं आरक्षण हे मी दिलं,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis comment on allegations about adv gunratna sadavarte pbs