मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी २० जानेवारीपासून मुंबईत बेमुदत उपोषण आंदोलनाची घोषणा केली असली, तरी सरकार आरक्षण प्रश्नी सकारात्मक असून चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले. मराठवाडयातील कुणबी नोंदींचा शोध घेण्यासाठी हैदराबादहून निजामकालीन जुनी कागदपत्रे मागविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपसह हिंदूत्ववादी संघटनांनी राममंदिराच्या उद्घाटन सोहळयानिमित्ताने मुंबईसह राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यज्ञयाग, मंदिराच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन, एक धागा श्रीरामांसाठी आदींचा त्यात समावेश आहे. राममंदिराचा जल्लोष साजरा करण्याची तयारी होत असताना जरांगे यांनी २० जानेवारीपासून मुंबईत बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आरक्षणप्रश्नी सरकारने वेगाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा >>> “…तर लोकसभेच्या ४८ जागा ताकदीनं लढवणार”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचा पुनरुच्चार करून फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:  याप्रकरणी लक्ष घातले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने शास्त्रीय सांख्यिकी (इंपिरिकल डेटा) गोळा करण्याचे काम वेगाने काम सुरू केले आहे. राज्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी नेमलेल्या माजी न्या. संदीप शिंदे समितीने दुसरा अहवाल सादर केला असून तिसरा अहवालही लवकरच अपेक्षित आहे. मराठवाडयातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी निजामकालीन जुनी कागदपत्रे हैदराबादहून मागविली जाणार आहेत.

न्या. शिंदे समिती काही दिवसांपूर्वी हैदराबादला गेली असताना उर्दू भाषेतील हजारो कागदपत्रे तेलंगणा सरकारच्या गोदामांमध्ये धूळ खात पडली असल्याचे आढळून आले. मराठवाडयातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी त्यांचा उपयोग होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने ती मागविण्याची शिफारस शिंदे समितीने केली होती. ती मान्य करून तेलंगणा सरकारशी संपर्क साधण्यात आला आहे.

राज्य सरकार सकारात्मक पद्धतीने व पूर्ण ताकदीने ओबीसींवर अन्याय होऊ न देता मराठा आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे उपोषण आंदोलन मागे घेतले जाईल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

जरांगे रुग्णालयात, आंदोलन २६ जानेवारीपासून

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण आंदोलन करण्यासाठी आंतरावली सराटी येथून २० जानेवारी रोजी निघणार असून मुंबईर्पयंत पोहोचण्यासाठी सहा दिवस लागतील. त्यानंतर म्हणजे २६ तारखेपासून प्रत्यक्ष उपोषणास सुरुवात केली जाईल, असे मराठा आरक्षण मागणीचे नेते मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.  रविवारी सायंकाळी खोकला आल्याने व अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान २४ जानेवारी रोजी क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातही चर्चा होणार आहे. दरम्यान मुंबईला मराठा आंदोलक कार्यकर्ते ट्रॅक्टर घेऊन जाणार असल्याची चर्चा सुरू झाली असल्याने पोलिसांनी आता ट्रॅक्टर मालकांचा शोध सुरू केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis comment on solution of maratha reservation issue zws
Show comments