मुंबई : भाजपला राजकीय पक्षांशी लढण्याचा अनुभव असून ‘भारत जोडो’सारख्या शक्तींविरोधातही लोकसभेत लढावे लागल्याने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला अपयश आले. मात्र आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित असल्याचे परखड प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलताना केले. ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’बाबतचे आक्षेप खोडून काढताना समाज एकसंध राहिला पाहिजे, या आवाहनात काहीही गैर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये सहभागी होताना फडणवीस यांनी लोकसभेतील पराभवाची कारणे, भाजपने केलेल्या उपाययोजना, सरकारची अडीच वर्षांतील कामगिरी, मराठा आंदोलन, विरोधी पक्षांचे आक्षेप आदींसह विविध मुद्द्यांवर मनमोकळेपणे भाष्य केले. ते म्हणाले, लोकसभेतील लढाई केवळ राजकीय पक्षांमधील नव्हती, तर समाजातील काही शक्तींविरोधातही होती. त्याविरोधात लढण्याची भाजपची क्षमता नव्हती व साधनेही नव्हती. त्यामुळे या शक्ती व विरोधकांकडून स्थानिक पातळीवर भाजपविरोधात अपप्रचार (फेक नॅरेटिव्ह) करण्यात आला. भाजप ४०० पार गेल्यावर राज्यघटना बदलणार, असा अपप्रचार केला गेला. शहरी नक्षलवादी शक्तींकडूनही भाजपविरोधात वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. त्याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला. मात्र आता त्या बाबींकडे लक्ष देऊन या शक्तींविरोधात लढण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>> ओबीसींची एकगठ्ठा मते मिळणे कठीणच; महायुतीबाबत अजित पवार यांचे मत

‘देशातील महत्त्वाच्या संस्थांविरोधात आणि शासकीय यंत्रणेविषयी अपप्रचार करणे, जनमानसातील प्रतिमा डागाळणे, हा शहरी नक्षलवाद आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या बाजूने निर्णय दिला, तर न्यायालय चांगले आणि विरोधात दिला की न्यायालयाविरोधात बोलायचे. निवडणुकीत विजय मिळाला की सर्व काही ठीक आणि निकाल विरोधात गेला की ईव्हीएम यंत्रांविरोधात बोलायचे. शासकीय यंत्रणा व संस्थांविरोधात जनतेचा विश्वास डळमळीत होईल, अशी वातावरणनिर्मिती करणे हा माझ्या दृष्टीने शहरी नक्षलवादच आहे,’ असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. अशा शक्तींचा सामना करण्याकरिता भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी निगडित सुमारे ३० संघटना व संस्थांची मदत घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. या संस्था व संघटना राजकारणात नाहीत, पण राष्ट्रविरोधी प्रचार खोडून काढायचा किंवा शासकीय यंत्रणेच्या विरोधातील अपप्रचाराला प्रत्युत्तर द्यायचे, आदी जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपविण्यात आल्या आहेत. त्याचे परिणाम दिसू लागले असल्याचे ते म्हणाले. शासकीय यंत्रणाविरोधी देशविघातक शक्तींविरोधात लवकरच पुराव्यांसह बोलण्याचे संकेत त्यांनी दिले.

मुस्लिमांकडून लोकसभा निवडणुकीत ‘व्होट जिहाद’ करण्यात आला आणि मतदानासाठी फतवे काढण्यात आले. त्यामुळे ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, धुळे अशा किमान ११ लोकसभा मतदारसंघांत मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण झाले व त्याचा फटका भाजप व महायुतीला बसला. राज्यातील किमान काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना भेटलेल्या उलेमांच्या शिष्टमंडळाने १७ मागण्या केल्या आहेत. त्यात राज्यात २०१२ ते २०२४ या काळात झालेल्या जातीय दंगलीत मुस्लिमांविरोधात दाखल झालेले खटले व गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. ती योग्य कशी? भाजपवर जातीयवादी म्हणून टीका केली जाते, पण काँग्रेसचे नेते हे मुस्लीम विभाग, मौलवी व समुदायांकडे जाऊन आम्ही तुमच्या पाठिंब्यावर निवडून येणार आहोत, असे खुलेआम सांगून मते मागत आहेत. धार्मिक ध्रुवीकरण किंवा धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण करणाऱ्यांना जातीयवादी न ठरविता धर्मनिरपेक्ष संबोधले जाते, अशी टीका फडणवीस यांनी केली.

‘भाजपला मतदानासाठी फतवे नाहीत’ भाजपला मत दिले नाही तर धर्माशी बेइमानी होईल. त्यामुळे भाजपला मतदान करावे, असे फतवे कोणत्याही मंदिरांमधून किंवा पुजाऱ्यांनी काढलेले नाहीत. मात्र काँग्रेसला मतदान करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत असे फतवे काढले गेले. अशा वेळी आम्ही ‘एक है तो सेफ है ’ आणि ‘बटेंगे तो कटेंगे’ असे समाज एकसंध ठेवण्याचे आवाहन जनतेला केले तर ते चुकीचे कसे,’ असा सवाल फडणवीस यांनी केला. आदिवासींमध्ये ५४ जाती आणि ओबीसींमध्ये ३५० हून अधिक जाती आहेत. त्यांनी आदिवासी व ओबीसी म्हणून एक राहावे, असे सांगण्यात काहीच चूक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis in loksatta loksamvad express confidence about mahayuti victory in maharashtra assembly poll zws