मुंबई : सरकारी मालकीची प्रसारण संस्था असलेल्या प्रसारभारतीने ‘डीडी न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीच्या बोधचिन्हाचा रंग बदलून भगवा केला आहे. ‘नव्या अवतारासह बातम्यांच्या नव्या प्रवासाला’ असे ‘डीडी न्यूज’ने जाहीर केले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना या रंगबदलावर सत्ताधारी भाजपकडून केले जात असलेले ‘भगवेकरण’ अशी टीका होऊ लागली आहे.
हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवरील भगव्या रंगातील दूरदर्शनच्या पहिल्या बोधचिन्हाचे अनावरण १९७६मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत बदललेल्या दूरदर्शनच्या बोधचिन्हांच्या रंगात भगवा, निळा, हिरवा असे रंग झळकत होते. मात्र, आता हे बोधचिन्ह पूर्णपणे भगव्या रंगात बनवण्यात आले आहे. ‘डीडी न्यूज’ने ‘एक्स’ समाजमाध्यमावरून १६ एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीमधून हे बोधचिन्ह सादर करण्यात आले. ‘आमची मूल्ये तीच आहेत, आम्ही आता नव्या रूपात आलो आहोत, बातम्यांच्या अभूतपूर्व प्रवासासाठी सज्ज व्हा,’ असे त्यात म्हटले आहे.
हेही वाचा >>> पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
बोधचिन्हाचा रंग बदलण्याच्या कृतीवर ‘प्रसारभारती’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांनी टीका केली आहे. ‘राष्ट्रीय प्रसारण संस्था असलेल्या दूरदर्शनने बोधचिन्हाचा रंग बदलून भगवा केला आहे. हे भगवेकरण धोकादायक असल्याचे मला माजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वाटते. प्रसारभारती आता ‘प्रचारभारती’ झाली आहे,’ असे त्यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.
आरती, केरळ स्टोरी..
गेल्या महिन्यात दूरदर्शनने अयोध्येतील श्री राम मंदिरातील आरतीचे थेट प्रक्षेपण करण्याचे जाहीर केल्यानंतर समाजमाध्यमांवरून टीकेचा सूर उमटला होता. तर याच महिन्याच्या सुरुवातीला दूरदर्शनवरून ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या मुद्दयावरून वाद झाला होता.
पक्षपाताचा आरोप
सरकारी वाहिनी असलेल्या दूरदर्शनवर आतापर्यंत अनेकदा सत्ताधारी पक्षाला धार्जिणे राहिल्याचा आरोप झाला आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दूरदर्शनवरून भाजपच्या सभांचे वृत्तांकन केले जात नसल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनीही ‘राष्ट्रीय दूरचित्रवाहिनी आपले व्यावसायिक स्वातंत्र्य राखू शकत नाही’ अशी टीका केली होती. आणीबाणीच्या काळातही विरोधी पक्षांनी दूरदर्शनवर पक्षपाताचा आरोप केला होता.
‘डीडी न्यूज’चे बोधचिन्ह भगव्या रंगात केल्याबद्दल समाजमाध्यमांतून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या असून हा सरकारी प्रसारण वाहिनीचे भगवेकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप होत आहे.