मुंबई : गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरात पालकांसोबत राहणारी दीड वर्षांची मुलगी शुक्रवारी सायंकाळी अचानक गायब झाली. शिवाजी नगर पोलिसांनी या मुलीचा शोध सुरू केला. शोध मोहिमेदरम्यान शनिवारी सकाळी या मुलीचा मृतदेह एका नाल्यात सापडला. दरम्यान, तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. शिवाजी नगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरातील प्लॉट नंबर ५ येथे ही मुलगी पालकांसोबत राहत होती. ही मुलगी शुक्रवारी सायंकाळी परिसरात खेळत असताना अचानक गायब झाली. बराच वेळ झाला तरी ती घरी न परतल्याने पालकांनी तिचा शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. अखेर पालकांनी शुक्रवारी रात्री उशिरा शिवाजी नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली.
हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्यास टाळाटाळ
पोलिसांनी या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. नाल्यामध्ये लहान मुलीचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मुलीचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह याच मुलीचा असल्याचे उघड झाले. मुलीच्या अंगावरील जखमांवरून तिची अज्ञात व्यक्तीने हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
© The Indian Express (P) Ltd