मुंबई : वांद्रे कार्टर रोड येथील माउंट मेरी चर्चसमोरील समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी डॉल्फिनचा मृतदेह आढळला. समुद्रीप्रेमींनी या घटनेची माहिती वन विभाग आणि कांदळवन विभागाला दिली. त्यानंतर घटनास्थळी वन विभागाच्या पथकाने मृत डॉल्फिनचा शोध घेण्यास सुरुवात केली. सोमवारी रात्री उशिरा सिस्टर बंगला, माउंट मेरीसमोरील समुद्रकिनाऱ्यावर सडलेल्या अवस्थेतील डाॅल्फिनचा मृतदेह दिसला. वन विभागाने मृत डॉल्फिनला ताब्यात घेतला. या डाॅल्फिनची लांबी सुमारे साडेतीन फूट, गोलाई अडीच फूट होती. डाॅल्फिन सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याचे शवविच्छेदन करणे शक्य नव्हते. त्याच्या मृत्युची नोंद करून त्याला वर्सोवा सागरकुटी समुद्रकिनाऱ्यावर दफन करण्यात आले, अशी माहिती वन विभागाने दिली.

Story img Loader