लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : वाढती उष्णता आणि कारखान्यांमधून सोडण्यात येणाऱ्या रसायनांमुळे नवी मुंबईमधील बेलापूर येथील दिवाळी खाडीच्या किनाऱ्यावर मृत माशांचा खच पडला आहे. यापूर्वी दोन-तीन वेळा खाडी किनाऱ्यालगत मृत माशांचा खच पडला होता. त्यामुळे मासेमारीवर उपजीविका असलेले कोळी बांधव चिंतीत झाले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून बेलापूर येथील दिवाळे खाडीत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले आहे. मात्र या प्रश्नाकडे प्रशासन फारसे गंभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार आणि पर्यावरणप्रेमींकडून सातत्याने करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी दिवाळे खाडी किनाऱ्यावर मृत मशांचा खच पडल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे यामध्ये वरख माशांचा देखील समावेश आहे. हा मासा काटेरी असल्यामुळे तो प्रामुख्याने मच्छीमार पकडत नहीत. याचबरोबर या माशाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत प्रदूषित पाण्यातही हा मासा तग धरु शकतो. मात्र, हे मासे मृतावस्थेत आढळल्यामुळे दिवाळे खाडीतील प्रदूषित पाण्याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे, असे मत मच्छीमार, तसेच लघु पारंपरिक मत्स्य कामगार संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी व्यक्त केले आहे.

जिताडा, खेकडा, कोळंबी आदी माशांचाही त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे जाळ्यात अडकलेले मासेही मृत अवस्थेत होते. असे मासे आरोग्याच्या दृष्टीने खाण्यास अयोग्य असल्याने विकता येत नाहीत. दरम्यान, हा प्रकार गेले अनेक महिने सुरू आहे. याबाबत तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांनी केला. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे रात्री-अपरात्री कारखान्यांमधून रासायनयुक्त पाणी प्रक्रिया न करता थेट खाडीत सोडण्यात येते. त्यामुळे खाडीतील जैवविविधता धोक्यात येवू लागली आहे, असा आरोप पवार यांनी केला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पूर्व उपनगरे, तसेच नवी मुंबईतील १५ मच्छीमारांनी ठाणे, दिवाळे आदी खाड्यांमध्ये दोन दिवस मासेमारी केली. तेथील पाण्याचे नमुने आयएसओ सर्टिफाईड खासगी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. प्रयोगशाळेच्या निकालानुसार पाण्यामध्ये बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड प्रति लिटर २० मिलीग्रॅमपर्यंत असणे अपेक्षित होते. मात्र ही पातळी १ हजार १५४ मिलीग्रॅम प्रति लिटर नोंदली गेली होती. केमिकल ऑक्सिजन डिमांडची मानक पातळी २५० मिलीग्रॅम प्रति लिटर असून नमुना दिलेल्या पाण्यात ती ३ हजार ४७० मिलीग्रॅम प्रति लिटर आढळली. डिझॉल्व्ह सॉलिडची पातळी २ हजार १०० मिलिग्रॅमप्रति लिटर अपेक्षित असताना ती १७ हजार १२३ मिलिग्रॅम प्रति लिटर इतकी होती. याचबरोबर पाण्याची पीएच पातळी ७.८६ इतकी होती.

मत्स्य प्रजाती नष्ट होण्याची भिती

खाडीतील प्रदूषणाच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. माशांच्या अंडी देण्याच्या ठिकाणी चिखल आणि रासायनिक कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे संवेदनशील असलेले मासे तेथे अंडी घालत नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून खाडीत आढळून येणाऱ्या अनेक मत्स्य प्रजाती कायमस्वरुपी नष्ट होण्याची भिती पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली.

संकटात असलेल्या प्रजाती

चिंबोरी, मुठे, तेल्या, निवटा, खवली, काचणी, हेसाळ, चिलोकटी, टोळके, मांदेली, कोत्या, टोळ, हरणटोळ, मांगीन, पिळसा, वरा, तेंडली, चांदवा, बिलजे, घोया, चिवनी, खरबी, केड्डी, जिताडा, करपाली, सफेद कोळंबी, पोचे, कोलीम (जवळा), खरपी चिंबोरा, खुबे, शिवल्या, कालवे, पालक आणि ढोमे या माश्यांच्या प्रजाती पूर्णत: नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.