एका अत्यवस्थ रुग्णाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली.पण अचानक हा रुग्ण जिवंत झाला. ही काल्पनिक घटना नसून शीव येथील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला आहे.
धारावीच्या पालिका वसाहतीत राहणारे चंद्रकांत गांगुर्डे (५५) यांना गेल्या गुरूवारी अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना शीव येथील ‘अथर्व हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर’ या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेंदूत रक्त साकळल्याचे कारण देत त्यांच्यावर न्युरोसर्जनमार्फत उपचार सुरू होते. मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयाचे डॉक्टर अतुल चिरमाडे यांनी गागुंर्डे यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवले. नंतर रात्री गांगुर्डे यांच्या मुलांना बोलावून ते मयत झाल्याचे सांगितले. मृतदेह भायखळा येथे किंवा शीव येथे घेऊन जा, असे डॉ. चिरमाडे यांनी सांगितले होते. परंतु एका रात्रीपुरता वडिलांचा मृतदेह रुग्णालयातच ठेवा, अशी विनंती त्यांच्या मुलांनी केली.
गांगुर्डे यांच्या निधनाच्या वृत्तामुळे त्यांचे सर्व नातेवाईक मुंबईला आले आणि अंत्ययात्रेची तयारीही सुरू करण्यात आली. धारावीत त्यांच्या निधनाचे फलकही लावण्यात आले होते. बुधवारी सकाळी जेव्हा गांगुर्डे यांची मुले रुग्णालयात गेली तेव्हा त्यांना वडिलांच्या शरीराची हालचाल सुरू असल्याचे दिसले. कृत्रिम श्वसनयंत्रणा काढल्यानंतर अर्धा तास हालचाल असते, असे सुरवातीला डॉक्टरांनी सांगितले. मात्र गांगुर्डे यांचा श्वास सुरू होता, तसेच ते जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्वरित त्यांना सलाईन देऊन पुढील उपचार करण्यात आले. गांगुर्डे यांना कोहिनूर रुग्णालयात नेण्यात आले आहे.
या प्रकरणी शीव पोलीस ठाण्यात चिरमाडे यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गावित यांनी सांगितले. डॉ. चिरमाडे यांनी माझ्याकडून कोऱ्या कागदावर सही घेतल्याचे गांगुर्डे यांचा मुलगा अण्णासाहेब याने सांगितले.
अंत्यविधीपूर्वीच ‘मृत’ जिवंत!
एका अत्यवस्थ रुग्णाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली.पण अचानक हा रुग्ण जिवंत झाला.
First published on: 12-12-2013 at 02:39 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dead man comes alive at own funeral