मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळातील ४ हजार ८२ घरांच्या सोडतीसाठीच्या अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला १० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्षांकडे पाठविण्यात आला असून प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ देण्यात येणार असल्याने आता सोडतही लांबणीवर जाणार आहे. नियोजित १८ जुलैला होणारी सोडत आता जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात होण्याची शक्यता आहे.
चार वर्षांनंतर ४ हजार ८२ घरांची सोडत जाहीर झाली असून यासाठी २२ मे पासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. यंदा पाहिल्यांदाच नव्या संगणकीय प्रणालीसह आणि नव्या बदलासह सोडत काढण्यात येत आहे. नव्या प्रक्रियेनुसार आवश्यक कागदपत्रे अर्ज करतानाच सादर करणे बंधनकारक आहे. अशा वेळी कागदपत्रे वेळेत उपलब्ध होत नसल्याने अनेक इच्छुकांना अर्ज करणे शक्य होत नाही. त्यामुळेच सोडतीला प्रतिसादही कमी मिळाला. या पार्श्वभूमीवर मंडळाने सोडतपूर्व प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला उपाध्यक्षांची मंजुरी मिळेल, अशी माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. प्रस्ताव मंजूर झाल्याबरोबर मुदतवाढीची अधिकृत घोषणा केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
मुंबई मंडळाच्या प्रस्तावानुसार अर्जविक्री-स्वीकृतीला १० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळ २६ जूनपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज भरण्याची मुदत ८ जुलैपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आरटीजीएस-एनईएफटीसह अनामत रकमेसह अर्ज भरण्याची मुदत २८ जूनऐवजी १० जुलै अशी होण्याची शक्यता आहे. या मुदतवाढीमुळे १८ जुलैला होणारी सोडत पुढे जाणार आहे.
अनामत रकमेसह ४६ हजार अर्ज दाखल
मुंबईतील ४ हजार ८२ घरांसाठी २२ मे पासून २२ जूनपर्यंत (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) अर्थात एका महिन्याच्या कालावधीत ६९ हजार ८०४ जणांनी अर्ज भरले आहेत. तर यातील ४६ हजार अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत. आता मुदतवाढ दिल्याने अनामत रकमेसह दाखल होणाऱ्या अर्जाची संख्या वाढेल अशी आशा मुंबई मंडळाला आहे.