मुंबई : बीएस्सी नर्सिंग आणि विधि तीन आणि पाच वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्ज नोंदणीसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाला १० मार्चपर्यंत, तर विधि तीन वर्षे व पाच वर्ष अभ्यासक्रमांसाठी १७ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येते. डिसेंबरमध्ये परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. मार्चच्या अखेरच्या आठवड्यामध्ये विविध अभ्यासाक्रमांच्या प्रवेश परीक्षा होत आहेत. त्यामुळे काही अभ्यासक्रमांची अर्ज नोंदणी प्रक्रिया संपुष्टात आली, तर काही अभ्यासक्रमांची अर्ज नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र विधि तीन वर्ष व पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी करण्यास राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीसाठी २८ जानेवारी आणि २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार २८ फेब्रुवारीपर्यंत सुमारे २७ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली. मात्र अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज अर्धवट स्थितीमध्ये किंवा अनेक विद्यार्थ्यांनी शुल्क भरलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी करण्यास १० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतला आहे. राज्यामध्ये बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या ११ हजार २८० जागा आहेत. गतवर्षी बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी राज्यभरातून ५८ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५० हजार २१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ९ हजार २४४ जागांवर प्रवेश झाले असून ६ हजार ७०८ मुली, तर २ हजार ५३६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते.

दरम्यान विधि तीन वर्ष अभ्यासक्रमासाठी २७ डिसेंबर २०२४ पासून अर्ज नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली होती. २८ फेब्रुवारी अंतिम मुदत होती. तसेच विधि पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी ३ जानेवारीपासून अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरूवात झाली. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणीसाठी १७ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गतवर्षी विधि तीन वर्ष अभ्यासक्रमासाठी ८० हजार १२५ विद्यार्थ्यांनी, तर विधि पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी ३४ हजार ७६६ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली होती.