खर्चही वाढण्याची शक्यता, जानेवारी २०२४ मध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
इंद्रायणी नार्वेकर
मुंबई : सागरी किनारी मार्ग हा पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याची अंतिम मुदत हुकण्याची शक्यता आहे. सुरुवातीला २०२२ मध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र न्यायालयाने घातलेली स्थगिती व टाळेबंदी यामुळे रखडलेल्या प्रकल्पाला आता वरळीतील आंदोलनामुळे आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प आता जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्चही वाढण्याची शक्यता आहे.
प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंत पालिकेतर्फे सागरी किनारा मार्ग तयार केला जात आहे. या मार्गाची लांबी १०.५८ किलोमीटर आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झालेला हा प्रचंड मोठा व गुंतागुंतीचा प्रकल्प आहे. समुद्रात भराव टाकून १११ हेक्टर जमीन तयार केली जाणार आहे. समुद्राच्या खालून बोगदे तयार केले, उन्नत मार्ग, समुद्री पूल असा हा एकूणच गुंतागुंतीचा प्रकल्प आहे. मात्र जुलै २०१९ मध्ये उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे सात महिने या प्रकल्पाचे काम पूर्ण बंद होते. तर त्यानंतर टाळेबंदीत कामगार मिळत नसल्यामुळे प्रकल्पाचे काम रखडले होते.
वरळी कोळीवाडय़ाजवळील जेट्टीच्या समोर बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या दोन खाबांमधील अंतर वाढवण्याच्या मागणीसाठी येथील मच्छीमार संघटनांनी काम रोखून धरले आहे. त्यामुळे या एकूण प्रकल्पावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन स्थगिती व टाळेबंदीमुळे या प्रकल्पाची अंतिम मुदत जुलै २०२३ ठरवण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काम पुन्हा रखडल्यामुळे आता या प्रकल्पाला डिसेंबर २०२३ किंवा जानेवारी २०२४ ची मुदत दिली आहे. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १२ हजार ७२१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत या प्रकल्पाकरीता साडेतीन हजार कोटी रुपये खर्च झाला असून ४८ टक्के काम पूर्ण झाले आहे.
प्रकल्पाची वैशिटय़े
- सागरी किनारा मार्गाची एकूण लांबी १०.५८ कि.मी.
- भराव टाकून बनवलेल्या रस्त्याची लांबी ४.३५ किमी
- पुलांची एकूण लांबी २.१९ किमी
- प्रस्तावित किनारी रस्ता प्रकल्पामध्ये ४-४ लेन भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे आहेत.
- प्रकल्प तीन टप्प्यांमध्ये विभागलेला आहे.
- पॅकेज ४ प्रिंसेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते प्रियदर्शिनी पार्क (४.०५ कि.मी.)
- पॅकेज १ प्रियदर्शिनी पार्क ते बडोदा पॅलेस (३.८२ कि.मी.)
- पॅकेज २ बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सी लिंक (२.७१ कि.मी )
- सागरी पदपथ – ८.५५ किमी
- सागरी तटरक्षक भिंत – ७.४७ किमी
- बोगद्याची लांबी प्रत्येकी २.०७२ कि.मी.
- भूमिगत वाहनतळ -तीन,
- वाहनसंख्या.. १८५६
प्रकल्पाचे सध्या ४८ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र एका विशिष्ट ठिकाणी काम रखडल्यामुळे त्याचा प्रकल्पाच्या गतीवर परिणाम होतो. या प्रकल्पात क्रमवार कामे असून प्रत्येक काम दुसऱ्या कामावर अवलंबून आहे. एक काम रखडले तर बाकीचा प्रकल्प पूर्ण होऊनही त्याचे लोकार्पण करता येणार नाही. प्रकल्पाला नक्की किती उशीर होईल हे सांगता येणार नाही. मात्र सध्या तरी डिसेंबर २०२३ किंवा जानेवारी २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका