लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः चार ते पाच मुले मालाड पश्चिम येथील मार्वे किनाऱ्यावर रविवारी गेली होती. समुद्रात जवळपास अर्धा किलोमीटर आत गेलेल्या मुलांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ती सकाळी पाऊणे दहाच्या सुमारास पाण्यात बुडाली. या घटनेची माहिती मिळताच तेथे असलेल्या अन्य पर्यटकांनी दोघा मुलांना बाहेर काढले. मात्र बेपत्ता असलेल्या एका मुलाचा सोमवारी सकाळी मृतदेह सापडला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
रविवार सुट्टीचा दिवस व त्यात पावसाची रिपरिप सुरु असल्याने पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी समुद्र किनारी, चौपाट्यांवर मोठी गर्दी केली होती. मालाड पश्चिम येथील मार्वे किनाऱ्यावर चार ते पाच मुले समुद्रात अर्धा किलोमीटर आत गेली. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पाच मुले पाण्यात बुडाली.
हेही वाचा… विधानसभेत पहिल्याच मिनिटात जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला; मुख्यमंत्र्यांनी नाव घेताच म्हणाले…!
मुले बुडत असल्याचे दिसताच तेथे उपस्थित पर्यटकांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले. यावेळी कुरशाना हरिजन (१६) व अंकुश शिवरे (१३) या दोघांना सुखरुप बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले. शुभम जयस्वाल (१२), निखील कायामुकूर (१३) व अजय हरिजन (१२) ही तीन मुले बेपत्ता असून त्या मुलांपैकी निखील कायामुकूर याचा मृतदेह सोमवारी सकाळी सात वाजता सापडला.