लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः डोंगरी येथील वाडीबंदर परिसरात गस्तीवर असलेले पोलीस हवालदार सोमनाथ गोडसे यांना शनिवारी रात्री चक्कर आल्यामुळे ते वाहनातच कोसळले. त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांना मृत घोषित केले. याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आणखी वाचा-सरकार जनतेच्या पैशावर परदेश दौऱ्यात मग्न; आदित्य ठाकरे यांचा आरोप
गोडसे १९९९ ला पोलीस दलात भरती झाले होते. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोडसे शनिवारी रात्रपाळीसाठी डोंगरी पोलीस ठाण्यात आले. ते डोंगरी-३ मोबाईल वाहनात कार्यरत होते. त्याच्यासह पोलीस हवालदार देसले हे देखील याच वाहनात कार्यरत होते. वाहन वाडीबंदर येथील गोदी परिसरात गस्त घालत असताना गोडसे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर वाहनातच चक्कर येऊन ते बेशुध्द झाले. देसले यांनी तत्काळ याबाबत दूरध्वनी करून माहिती दिली. त्यानंतर मोबाईल-१ वाहनाने गोडसे यांना सर जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून मध्यरात्री १२ च्या सुमारास त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.