मुंबई : रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.याप्रकरणी बिहार येथील दरभंगा येथून एका संशयीताला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी एका अज्ञात व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयाला दोन दूरध्वनी करून धमकी दिली होती. याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन पोलीस धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, धमकीच्या दूरध्वनीनंतर अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयातील दूरध्वनीवर बुधवारी दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी व सायंकाळी 5 च्या सुमारास एका अज्ञात क्रमांकावरून दोन दूरध्वनी आले होते. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स रग्णालय उडवून देण्याची धमकी दिली. तसेच मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, आकाश अंबानी व अनंत अंबानी यांना जीवे ठार मारण्याची आणि अंबानी कुटुंबियांचे अँटेलिया हे निवासस्थानही उडवण्याची धमकी दिली. याप्रकरणी तक्रार करण्यात आल्याचे रिलायन्स समुहाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि पत्नी निता अंबानींना जीवे मारण्याची धमकी, अज्ञाताच्या फोननंतर ‘अँटिलिया’ची सुरक्षा वाढवली

रुग्णालय प्रशासनाने याची माहिती डी. बी. मार्ग पोलिसांना दिली. पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. याप्रकरणी तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी रिलायन्स रुग्णालय आणि अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटेलिया या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. याप्रकरणी सर्व बाजूने तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : “सोनं नाही भंगार…” उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजपाच्या प्रसाद लाड यांची टीका, म्हणाले “अमित शाहांवर टीका करण्याइतकी उंची नाही”

रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात ऑगस्ट महिन्यातही धमकीचा दूरध्वनी करुन प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन डी. बी. मार्ग पोलिसांनी वेगाने तपास करून दक्षिण मुंबईतून सराफ व्यावसायिकाला अटक केली होती.

Story img Loader