अँटिलाया निवासस्थानाजवळ स्फोटके असलेली जीप उभी करण्यात आल्याच्या प्रकरणानंतर आता उद्योजक मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयातील दूरध्वनीवर सोमवारी सकाळी धमकीचा फोन आला होता. अज्ञात व्यक्तीने फोनवरून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मुंबईतील ‘अँटिलिया’ या निवासस्थानी आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली आहे. दरम्यान, एका अज्ञात इसमाने सोमवारी सकाळी ७-८ च्या सुमारास रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील दूरध्वनीवर मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिल्याचे समजते. याप्रकरणी रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या धमकीच्या फोनबाबत तत्काळ माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन धमकी आलेल्या क्रमांकाची तपासणी केली. तसेच, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले असून पोलिसांचे एक पथक अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानी रवाना झाले. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘अँटिलिया’ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.