लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : युट्युब वाहिनीवर राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली मुलाखत देणारी व्यक्ती व फेसबुक, ट्वीटर खाते वापरकर्त्याविरोधात सांताक्रुझ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन समाजामध्ये दंगा भडकवण्याच्या उद्देशाने चिथावणीखोर वक्तव्य करणे व सार्वजनिक शांतता भंग होईल असे विधान करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

शिवसेना पदाधिकारी अक्षय पनवेलकर यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी भादंवि कलम १५३ (अ), ५००, ५०५ (३), ५०६ (२) व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, मंगळवारी सायंकाळी तक्रारदार फेसबुक पाहत असताना एका चित्रफीतीमध्ये मुलाखत देणारी व्यक्ती उपमुख्यमंत्री फडणवीस यांना ठार मारण्याबाबत वक्तव्य करीत होता. तसेच यावेळी त्याने दोन जातींमध्ये वाद निर्माण होईल, असे वक्तव्यही केले. तसेच फडणवीस यांची बदनामी केली. ही चित्रफीत युट्युब, फेसबुक व ट्वीटरवर वायरल झाली होती. ‘योगेश सावंत ७७९६’ या वापरकर्त्याने ती फेसबुकवर अपलोड केली होती. तसेच ट्वीटरवरही एका युजरआडीवरून ही चित्रफीत अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे फडणवीस यांना ठार मारण्याची धमकी व दोन समाजांमध्ये द्वेष निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीनंतर सांताक्रुझ पोलिसांसह गुन्हे शाखेनेही याप्रकरणी तपासाला सुरूवात केली आहे.

आणखी वाचा-संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन नवीन पक्ष्यांची नोंद; पांढरा गाल असलेला तांबट,पिवळा बल्गुलीचे दर्शन

यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांना मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातून एका १९ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली होती. त्या प्रकरणीही अक्षय पनवेलकर यांनीच तक्रार केली होती. आरोपीने त्यावेळी ‘मी बंदुक द्यायला तयार आहे, पण तुझे लक्ष्य एकनाथ शिंदे व श्रीकांत हवे आहे’, अशा आशयाची पोस्ट केली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death threat to deputy chief minister devendra fadnavis on social media case filed in santacruz police station mumbai print news mrj