भिवंडी येथील अरिहंत कंपाऊंडमधील दुर्घटनाग्रस्त इमारतीचे ढिगारे उपसण्याचे काम शुक्रवारी दुपारी पूर्ण झाले असून या घटनेत एकूण सहा कामगारांचा मृत्यू तर २८ कामगार जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी कपडा कारखान्याचा मालक संजय देढीया, हसमुख देढीया, प्रेम पंजाबी, बांधकाम ठेकेदार चिन्ना, मुन्शी आणि वास्तुविशारद रशीद अब्दुल रेहमान धुरू ऊर्फ रविश या सहा जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी रशीद याला अटक करण्यात आली आहे. उर्वरित पाच जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
 येथील अरिहंत कंपाऊंडमध्ये असलेली कापड कारखान्याची दुमजली इमारत बुधवारी कोसळली. या कारखान्यामध्ये सुमारे ४५ कामगार काम करीत होते. या अपघातामध्ये मुन्ना वजुल दिवान (२५), वीरेंद्र पांडे (४५), तजामुल शेख (३२), तारीक शेख (२३), मिराज शेख (२०) आणि मोहम्मद  मन्सुर (२२) या सहा कामगारांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या २८ कामगारांपैकी काही जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. तसेच काही जखमींना सायन आणि नायर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Story img Loader