माहीममधील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील ‘आफताब’ या चार मजली इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या दहा झाली आहे. सोमवारी रात्री ही इमारत कोसळली होती. सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याचे वकील अ‍ॅड. रिझवान र्मचट याच्या कुटुंबातील दोघांचा या दुर्घटनेतील मृतांमध्ये समावेश आहे. दरम्यान, मंगळवारी रात्रीही ढिगारा उपसण्याचे काम सुरुच होते.
माहीमच्या छोटा दग्र्यासमोर आफताब ही इमारत आहे. या इमारतीत १६ कुटुंबे राहातात. सोमवारी रात्री तिचा काही भाग अचानक कोसळला. ढिगाऱ्याखाली अडकून झैबुन्निसा अब्दुल सत्तार लाखा (७६) आणि हमिदा अन्सारी शेख (५०) यांचा सोमवारी मृत्यू झाला. मंगळवारी मोबिन लाखा (१८), मोहसानी अहमद बाटलीवाला (७५), ताहिरा गुलाब हुसैन र्मचट (७८), फरहाज रिझवान र्मचट (१८), आसिफा रिझवान र्मचट (५०), झेबा अमिन (१६), आनंद मित्तानी (१२) आणि मरियम मित्तानी (७) आदींचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आले. तळमजल्यावरील दुकानात सुरू असलेल्या कामामुळे इमारतीला तडे गेले होते. त्यामुळेच ही इमारत कोसळल्याची चर्चा आहे. मात्र त्यास अग्निशमन दल अथवा पोलीस दलाकडून दुजोरा मिळू शकला नाही.