मुंबईतील गोवरमुळे मृत्यू झालेल्या संशयित रुग्णांची संख्या १२ वर पोहोचली असून यापैकी आठ रुग्णांचा गोवरने मृत्यू झाल्याचे निश्चित झाले होते, तर चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद संशयित म्हणून झाली होती. मात्र सोमवारी यापैकी एका रुग्णाचा मृत्यू विश्लेषणाचा अहवाल नकारात्मक असल्याचे प्रयोगशाळेकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मुंबईतील संशयित गोवर मृत्यूंची संख्या आता तीनवर झाली आहे.
मुंबईत सोमवारी गोवरचे २६ रुग्ण आढळले असून गोवरच्या रुग्णांची संख्या ४१२ इतकी झाली आहे. तसेच ताप व पुरळ असलेल्या संशयित ७७ रुग्ण आढळले असून संशयित रुग्णांची संख्या ४ हजार ५८७ इतकी झाली आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत चार संशयित गोवरच्या मृत्युची नोंद झाली होती. यातील एका रुग्णाचा प्रयोगशाळेतील अहवाल नकारात्मक आल्याने संशयित मृत्युंची संख्या तीन झाली आहे. मुंबईतील विविध रुग्णालयातून ४० रुग्णांना सोमवारी घरी सोडण्यात आले तर १९ नवे रुग्ण दाखल झाले आहेत.
मुंबईतील गोवरच्या रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यातील रुग्णसंखेतही मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. राज्यात सोमवारी ८३६ गोवरच्या रुग्णांची नोंद झाली असून, १३ हजार २४८ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक चार हजार ५८७ रुग्ण सापडले असून, त्याखालोखाल मालेगाव भिवंडीमध्ये ९०० पेक्षा अधिक, तर ठाणे, वसई-विरार येथे ३०० पेक्षा कमी नोंदवण्यात आली आहे.