समतोल पध्दतीने मांडणी असल्याचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी स्पष्ट केले
मुंबई : महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित ‘फुले’ या हिंदी चरित्रपटावरून सध्या वादाचे मोहेळ उठले आहे. सुरुवातीला ब्राह्मण महासंघाने चित्रपटाबद्दल आक्षेप घेतला, त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने काही प्रसंगांमध्ये बदल सुचवल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलल्याची चर्चा सुरू आहे.
मात्र, चित्रपटाला सेन्सॉरचे ‘यू’ प्रमाणपत्र आधीच मिळाले आहे, सध्या विविध जातीसंस्था आणि लोकांमध्येच या चित्रपटावरून गैरसमज निर्माण झाले असल्याने गोंधळ वाढला आहे. हे गैरसमजाचे धुके कमी होऊन सगळ्या प्रेक्षकांना शांतपणे चित्रपट पाहता यावा यासाठी ‘फुले’ चित्रपटाचे प्रदर्शन २५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.
स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य, त्यांचा संघर्ष समाजापुढे मांडणारा अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा हिंदी चरित्रपट ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. जोतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस होता, मात्र चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आधी ब्राह्मण महासंघाने त्यावर आक्षेप घेतला.
महात्मा फुले यांना ब्राह्मणांकडून अन्याय्य वागणूक मिळाल्याचे एकांगी चित्रण या चित्रपटात असल्याचा दावा ब्राह्मण महासंघाने केला होता. फुले यांना स्त्री शिक्षणासाठी ब्राह्मण समाजाकडून मदतही मिळाली होती, त्याचा उल्लेख चित्रपटात नाही, असे सांगत काही गोष्टींवर महासंघाने आक्षेप घेतला. त्यानंतर दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी चित्रपटात अशा पध्दतीने कुठल्याही समाजाचे एकांगी चित्रण करण्यात आलेले नाही, याची खात्री महासंघाला दिली होती. मात्र, त्याचवेळी सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही प्रसंगांना कात्री लावण्यास सांगितल्याचे वृत्त पसरले आणि वादाला चहूकडून तोंड फुटले. या वादविवादाच्या गोंधळात चित्रपट प्रदर्शित न करता तो २५ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय अनंत महादेवन यांनी घेतला आहे.
सेन्सॉर बोर्डाची गोपनीय माहिती लोकांपर्यंत पोहोचली कशी ?
अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘फुले’ चित्रपटात महार, मांग, मनूची जाती व्यवस्था अशा काही शब्दांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. तसेच ब्राह्मण मुलाने सावित्रीबाईंवर शेण फेकण्याचा प्रसंग अशा काही दृश्यांमध्ये बदल सुचवले होते, असे सांगितले जाते. ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतल्यानंतर सेन्सॉरने काही प्रसंगांना कात्री लावण्यास सांगितली, अशीही चर्चा सुरू झाली होती. मात्र, या चर्चेत तथ्य नसल्याचे महादेवन यांनी स्पष्ट केले. ‘११ एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित होणार होता.
महासंघाने आक्षेप घेण्याआधीच सेन्सॉरचे यू प्रमाणपत्र आम्हाला मिळाले होते. सेन्सॉरसाठी दोन वेळा चित्रपट दाखवण्यात आला. सुरूवातीला सेन्सॉर सदस्यांना चित्रपट दाखवल्यानंतर जे बदल सुचवण्यात आले होते, ते करून दुसऱ्यांदा चित्रपट दाखवण्यात आला आणि प्रमाणपत्र मिळाले. सेन्सॉरने नेमका कशावर आक्षेप घेतला याबद्दल तपशील देण्यास महादेवन यांनी नकार दिला. मात्र, सेन्सॉरची गोपनीय माहिती लोकांपर्यंत पोहोचली कशी ? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
चित्रपटात सर्वसमावेशक आणि समतोल मांडणी
‘फुले’ चित्रपटात इतिहास आहे तसाच मांडलेला आहे. कुठल्याही जातीसमूहाचा अनादर वा एकांगी चित्रण केलेले नाही, असे महादेवन यांनी स्पष्ट केले. सध्या विविध जाती संस्थांच्या लोकांमध्ये चित्रपटावरून विनाकारण वाद सुरू आहे. चित्रपटात वादविवाद होईल असे काहीही नाही. हा वाद शांत झाल्यावरच २५ एप्रिल रोजी सगळे प्रेक्षक ‘फुले’ चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकतील, असेही त्यांनी सांगितले.