|| प्रसाद रावकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्चपर्यंत कर न भरल्यास २ टक्के व्याजाचा भुर्दंड

मुंबई : महसूल वृद्धीसाठी मालमत्ता कराच्या देयकांचे येत्या सोमवारपासून वाटप सुरू होत असून मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कराची रक्कम न भरणाऱ्यांना दोन टक्के व्याजाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. मात्र त्यानंतरही करासह व्याजाच्या रकमेचा भरणा न करणाऱ्यांच्या मालमत्तेवर जप्ती-अटकावणीची प्रक्रिया पूर्ण करून तिचा लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

टाळेबंदीच्या काळात करनिर्धारण आणि संकलन विभागातील कर्मचाऱ्यांची करोनाविषयक कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराची या काळात वसुलीच झाली नाही. किंबहुना करदात्यांना मालमत्ता कराची देयकेही मिळू शकलेली नाहीत. देयके तयार करण्याचे काम नागपूरमधील कंपनीला देण्यात आले असून कंपनीकडून आता पालिकेला देयके उपलब्ध झाली आहेत. देयकांचे वितरण सोमवारपासून करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून मालमत्ता कराच्या थकबाकीचा आकडा वाढत आहे. आजघडीला ही रक्कम १५ हजार कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. यापैकी साधारण निम्म्या रकमेची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. उर्वरित रक्कम वसूल करण्यावर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांत केवळ  ६३५ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. येत्या मार्चपर्यंत भरणा न करणाऱ्यांना कराच्या रकमेवर दोन टक्के व्याजाच्या रूपात दंडाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. मात्र तरीही कर न भरल्यास २१ दिवसांची नोटीस बजावून जप्तीची कारवाई करण्यात येईल व त्यानंतर  त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान

चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी ६७६८.५८ कोटी रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज पालिका आयुक्तांनी सादर केलेल्या २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात व्यक्त केला आहे. मात्र चालू वर्षातील देयकांचे अद्याप वितरण झालेले नाही. त्यामुळे कर वसुलीचे उद्दिष्ट्य गाठण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे, अशी कबुली या अधिकाऱ्याने दिली.