मुंबई : मुंबई आणि पुणे या देशातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीनला १ जून २०२४ रोजी ९४ वर्षे पूर्ण होणार आहेत. दररोज पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास करणारे प्रवासी केक कापून डेक्कन क्वीनचा वाढदिवस दरवर्षी साजरा करतात. मात्र, यंदा वाढदिवशी डेक्कन क्वीन रद्द असल्याने रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. सीएसएमटी येथे ब्लाॅक असल्याने १ जून रोजी पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनसह सिंहगड, डेक्कन, प्रगती, इंटरसिटी या रेल्वेगाड्या रद्द असतील.
मध्य रेल्वेवरील सीएसएमटीवरील फलाट क्रमांक १०-११ चे विस्तारीकरण करून २४ डब्यांची रेल्वेगाडी उभी करण्यासाठी पायाभूत कामे सुरू आहेत. त्यासाठी १ जून रोजी रात्री १२.३० वाजल्यापासून ते २ जून रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंत ३६ तासांचा ब्लाॅक घेतला आहे. यात डेक्कन क्वीनची सेवा खंडित केली आहे.
हेही वाचा – विमानात धुम्रपान करणाऱ्या प्रवाशाला अटक
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी ग्रेट इंडियन पेनिन्सुला या रेल्वे कंपनीद्वारे पहिली डिलक्स ट्रेन सेवा म्हणून १ जून १९३० रोजी मुंबई-पुणे मार्गावर ‘डेक्कन क्वीन’ एक्स्प्रेस सुरू केली. सुरुवातीला त्यातून फक्त ब्रिटिशच प्रवास करू शकत होते. मात्र १९४३ साली भारतीयांना देखील प्रवास करण्याची परवानगी मिळाली. तेव्हापासून प्रवाशांचा प्रतिसाद डेक्कन क्वीनला मिळू लागला. आशिया खंडातील विद्युत यंत्रणेवर धावणारी पहिली ट्रेन ही डेक्कन क्वीन आहे. प्रवाशांना या रेल्वेगाडीबाबत प्रचंड जिव्हाळा आहे. मात्र, यंदा डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करता येणार नसल्याने, प्रवासी वर्गाने नाराजीचा सूर आळवला आहे.
डेक्कन क्वीनला ९४ वर्षाची
दरवर्षीप्रमाणे डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन होते. मात्र, सीएसएमटी येथील ब्लाॅकमुळे १ जून रोजी डेक्कन क्वीन रद्द आहे. त्यामुळे वाढदिवस साजरा करता येणार नाही. मात्र, या दिवशी पुणे स्थानकात किंवा डेक्कन क्वीन सुरू झाल्यानंतर वाढदिवस साजरा करू. सीएसएमटी येथील फलाटांचे विस्तारीकरण झाल्यास डेक्कन क्वीनच्या डब्यात वाढ करण्याची मागणी आहे. – इक्बाल मुलाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ पिंपरी, चिंचवड
हेही वाचा – कपिल पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात? विधान परिषद न लढण्याचा निर्णय
मध्य रेल्वेकडून मे महिना, सण-उत्सव आले की ब्लाॅक घेतले जातात. अनेक प्रवासी हे चार महिन्यांपूर्वीच तिकीट आरक्षित करतात. मात्र ऐनवेळी ब्लाॅक घेतल्याने, प्रवाशांचे नियोजन बिघडते. पुणे-मुंबई-पुणे रेल्वेगाड्या या ठाणे किंवा दादरपर्यंत चालवणे आवश्यक होते. तसेच इंद्रायणी एक्स्प्रेसला जादा डबे जोडणे आवश्यक होते. – नितीन परमार, प्रवासी