सहा महिन्यांसाठी डेक्कन क्वीनवर ‘महाराष्ट्र पर्यटना’चे वेष्टन; साडेसहा लाखांच्या महसुलासाठी रेल्वेचा निर्णय
हिरव्यागार डोंगरदऱ्यांतून ‘झुकूझुकू’ करत जाणाऱ्या आणि ‘पेशवाई-पुणे’ दाखवायला नेणाऱ्या ‘दख्खनच्या राणी’चा ‘निळा-पांढरा’ पोशाख तिच्या चाहत्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र पुढील सहा महिने ही रंगसंगती हद्दपार होणार असून त्याची जागा महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या जाहिरातीने घेतली आहे. प्रवाशांची ही लाडकी गाडी गेले आठ दिवस महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांची छायाचित्रे एखाद्या ‘कोलाजा’प्रमाणे आपल्या अंगावर वागवत धावत आहे. मात्र या जाहिरातींमधून मध्य रेल्वेला सहा महिन्यांत सुमारे साडेसहा लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे.
१ जून १९३०मध्ये मुंबई-पुणे यांदरम्यान सुरू झालेल्या या गाडीने आतापर्यंत लाल, पिवळा आणि सध्याचा निळा, असे तीन रंग आपल्या अंगावर वागवले आहेत. याच गाडीने वर्षांनुवर्षे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह दोन्ही शहरांतील लाखो प्रवाशांचे या गाडीसह भावनिक नातेही आहे. प्रवासी गाडीतील एकमेव ‘डायनिंग कार’ही केवळ याच गाडीला जोडलेली आहे. एखाद्या गाडीवर गीत लिहिले जाण्याचा दुर्मीळ बहुमानही या गाडीला मिळाला आहे. त्यामुळे प्रवाशांना ही गाडी, तिची निळी-पांढरी रंगसंगती, निळ्याला पांढऱ्यापासून वेगळा करणारा लाल रंगाचा पट्टा, या गोष्टी जिव्हाळ्याच्या वाटत आल्या आहेत.
मात्र, गेल्या आठ दिवसांपासून या गाडीचा ‘निळा-पांढरा’ पोशाख गायब झाला असून त्यावर ‘महाराष्ट्र पर्यटना’चे वेष्टन चढले आहे. रेल्वेने महाराष्ट्र पर्यटन महामंडळासह सहा महिन्यांचा करार केला असून पुढील सहा महिने महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांची माहिती देणारी जाहिरात ‘दख्खनच्या राणी’वर झळकणार आहे. या जाहिराती पाहून नियमित प्रवाशांनी नाके मुरडली असली, तरी उत्पन्नाचे साधन म्हणून रेल्वेने हा मार्ग पत्करला आहे. ‘डेक्कन क्वीन’ ही भारतीय रेल्वेची एक महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची गाडी आहे. अशा गाडय़ांची रंगसंगती रेल्वेने सांभाळायला हवी. उत्पन्नाचे साधन म्हणून उद्या ‘राजधानी’ वा ‘शताब्दी’सारख्या गाडय़ांवर जाहिराती लावण्यास रेल्वे तयार होणार का, असा प्रश्न डेक्कन क्वीनने नियमित प्रवास करणाऱ्या प्रकाश देशपांडे यांनी विचारला आहे. गाडय़ांवर अशा जाहिराती डकवण्यासाठी रेल्वेला प्रत्येक डब्यामागे दरवर्षी ७० हजार रुपये मिळतात. ‘डेक्कन क्वीन’साठी १८ डबे निश्चित असून त्यातून रेल्वेला वार्षिक १२.६० लाखाचे उत्पन्न मिळणे अपेक्षित असते. मात्र हा करार सहा महिन्यांसाठी असून त्यातून मध्य रेल्वेला ६.३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा