लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या अंधेरीमधील गोपाळकृष्ण गोखले रेल्वे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी आता डिसेंबर २०२३ चा मुहूर्त धरण्यात आला आहे. या पुलाच्या दोन मार्गिका पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यात येणार होत्या. मात्र नियोजित वेळेत पूल वाहतुकीसाठी सुरू होऊ न शकल्यामुळे आता नवा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. या वर्षअखेरीस पुलावरून दुतर्फा वाहतूक सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम प्रगतिपथावर आहे. या उड्डाणपुलाच्या बांधकामाची पाहणी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी शनिवारी केली. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी कामाचा आढावा घेतला. रेल्वे परिसरातील पोलादी तुळई (स्टील गर्डर) निर्मितीची सध्यस्थिती, आगामी काळातील रेल्वे ब्लॉकचे नियोजन करण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधितांना सूचना केल्या. महानगरपालिकेच्या हद्दीतील पुलाच्या आसपासच्या भागातील रहिवाशांना त्रास होऊ नये म्हणून दुतर्फा ध्वनी प्रतिबंधक (साऊंड बॕरियर्स) बसविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दुतर्फा वाहतूक सुरू करण्यासाठी डिसेंबर २०२३ चे उद्दिष्ट ठेवा, अशी सूचनाही त्यांनी पूल विभाग आणि रेल्वे अधिकाऱ्यांना केली. पश्चिम उपनगरात पावसाळापूर्व उपाययोजनांसाठी हाती घेतलेल्या विविध कामांची पाहणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी महानगरपालिकेच्या संबंधित विभागांतील अधिकारी उपस्थित होते.
आणखी वाचा-सागरी किनारा मार्गामुळे मुंबईकरांना मिळणार ७.५ किलोमीटर लांबीचा सागरी पदपथ
गोखले पुलाच्या बांधकामामुळे यंदा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अंधेरी आणि मीलन भुयारी मार्गाचा वापर होणार आहे. या दोन्ही परिसरांत पावसांचे पाणी साचू नये यासाठी काटेकोरपणे नियोजन आणि उपाययोजना करण्याचे निर्देश वेलरासू यांनी यावेळी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला दिले.
पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी अंधेरी भुयारी मार्ग परिसरात अधिक क्षमतेचे पाणी उपसा करणारे पंप बसविण्यात येणार आहेत. या परिसरात जलदगतीने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप, पूरप्रतिबंधक दरवाजे बसवण्याच्या कामाची पाहणी वेलरासू यांनी केली.
अंधेरी सब-वेसाठी सहा ठिकाणी पंप
अंधेरी भुयारी मार्ग परिसरासाठी एकूण तीन ठिकाणी पाणी उपसा करणारे सहा पंप आणि पूरप्रतिबंधक यंत्रणा उभारण्यात आली आहे. अंधेरी परिसरातील मिलेनियम इमारत, विरा देसाई मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग परिसरात ही यंत्रणा उभारली आहे. ताशी ३ हजार घनमीटर क्षमतेचे सहा पंप तीन ठिकाणी बसविण्याचे काम पर्जन्य जलवाहिन्या विभागाने पूर्ण केले आहे. तर १ हजार घन मीटर क्षमतेचे दोन पंप बसविण्यात आले आहेत.
मीलन भुयारी मार्गाला यंदा दिलासा
सांताक्रुझ येथील मीलन भुयारी मार्ग परिसरात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी भूमिगत पाणी साठवण टाकी प्रकल्पाच्या कामाची पाहणी वेलरासू यांनी केली. यंदा येथे अतिरिक्त पंपाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात सांताक्रुझ परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.