मुंबई : सोलापूर येथील एनसीपी प्रकल्पासाठी बांबू बायोमास विकत घेऊन, त्याचे कोळशाबरोबर मिश्रण करून जाळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. बांबू बायोमासच्या शाश्वत पुरवठ्यासाठी सुरुवातीला शेतकरी उत्पादक कंपन्या मार्फत ५० वर्षाच्या खरेदीसाठी करार करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर येथील एनटीपीसीच्या प्रकल्पासाठी कोळशा ऐवजी १०० टक्के बांबू आधारित बायोमासचा वापर करावा, अशा मागणीचे पत्र एनटीपीसीला पाठवले होते. त्यानंतर एनटीपीसीचे अध्यक्ष गुरुदीप सिंह आणि मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास टास्कफोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे (मित्रा) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी आणि एनटीपीसीचे सोलापूर प्रकल्प प्रमुख तपन कुमार बंडोपाध्याय यांच्यात झालेल्या बैठकीनंतर कोळशाबरोबर बाबा आधारित बाहेरचा वापर करण्यावर एकमत झाले आहे.
गुरुदीप सिंह म्हणाले, “ऊर्जा निर्मितीसाठी आता बांबू बायोमास विकत घेऊन कोळशाबरोबर मिश्रिण करून ते जाळण्याचा निर्णय सोलापूर एनटीपीसीने घेतला आहे. एनटीपीसी सोलापूरला वार्षिक ४० लाख टन कोळसा लागतो. यामध्ये सुरुवातीला दहा टक्के बांबू बायोमासचे मिश्रण केले जाईल. सुरूवातीला आम्हाला जवळपास चार लाख टन बायोमासची गरज असणार आहे.”
या निर्णयाचा थेट लाभ बांबू उत्पादक शेतकऱ्यांना होईल.
बांबूची उपलब्धता होईल, तसे बांबू बायोमासचे प्रमाण वाढवून त्यांनी वीस ते तीस टक्क्यांवर किंवा त्यापेक्षा जास्त करू. यासाठी बांबू उत्पादक शेतकऱ्यांचे बायोमास उत्पादन शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून विकत घेण्याबाबत आम्ही दीर्घकालीन करार करण्यासाठी तयार आहोत, असेही सिंह म्हणाले.
सोलापूर, लातूर आणि धाराशीव जिल्ह्यांत जास्तीत जास्त बांबू लागवड झाली तर एनटीपीसीचा सोलापूर मधील संपूर्ण प्रकल्प हा बांबू बायोमासवर चालू शकतो, असा विश्वास पाशा पटेल यांनी यावेळी व्यक्त केला.’मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी म्हणाले, “बांबू लागवडीसाठी ‘मित्रा’मार्फत आवश्यक ते सहकार्य देण्यात येणार असून, या कामी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घ्यावा.”