मधु कांबळे

करोना साथरोगाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या विद्यापीठ, महाविद्यालयीन परीक्षा कधी घ्यायच्या याबाबतचा आढावा सोमवारी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत घेणार आहेत. त्याचबरोबर मंगळावारी राज्यपालांकडेही बैठक होणार आहे. त्यानंतर परीक्षा घेण्याबाबत काय करायचे, याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सामंत यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

करोना साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी कमी करणे आवश्यक होते. या विषाणूचा राज्यात शिरकाव होऊ लागतताच सर्व विद्यापीठांचे कु लगुरू आणि विभागातील अधिकारी यांच्याशी चर्चा करुन विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील सर्व प्रकारच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्री उदय सामंत यांनी घेतला. त्यात अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या  परीक्षांचाही समावेश आहे. त्यानंतर सर्व विद्यापीठे, महाविद्यालये बंद करुन आवश्यक असेल तिथे घरातून काम (वर्क फ्रॉम होम) काम करण्याची परवानगी देण्यात आली.  ३१ मार्चपूर्वी आढावा घेऊन परीक्षांबाबत काय करायचे याचा निर्णय घेण्याचे ठरले होते. मात्र दरम्यानच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण टाळेबंदी जाहीर केली. करोना साथरोग अटोक्यात आणण्यासाठी के ंद्र व राज्य सरकार युद्ध पातळीवरुन प्रयत्न करीत आहे.  राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठ आणि महविद्यालयीन स्तरावरील परीक्षांचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सोमवारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यात परीक्षा घेण्याबाबत काय करायचे याचा आढावा घेतला जाईल. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची शासन काळजी घेईल.

-उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री