मुंबई : ‘स्वस्त आणि मस्त प्रवास’ अशी ओळख असलेली बेस्ट उपक्रमाची बस ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बेस्ट उपक्रमाची सेवा आर्थिक कोंडी आणि ढिसाळ नियोजनात अडकली आहे. त्यामुळे या आर्थिक गणिते सुधारण्यासाठी तिकीट दरात वाढ करण्याची शक्यता होती. मात्र, नवीन वर्षात तिकीट दरवाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या ३२ लाखांहून अधिक प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान बेस्ट उपक्रमाचा २०२५ – २६ या आर्थिक वर्षाचा २ हजार १३२ कोटी तुटीचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेला नुकताच सादर करण्यात आला. सार्वजनिक वाहतूक सेवा ‘ना नफा, ना तोटा’ तत्वावर चालविण्यात येते. त्यामुळे बेस्ट उपक्रम कधी नफ्यात नव्हता. परंतु, गेल्या काही वर्षांपासून बेस्टचा तोटा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बस तिकीट दरवाढ करण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, अर्थसंकल्पात कोणतीही दरवाढीची तरतूद करण्यात आलेली नाही. बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांनी नुकताच बेस्ट उपक्रमाचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा ९,४३९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेतील प्रशासकीय स्थायी समिती तथा पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांना सादर केला. या अर्थसंकल्पात परिवहन विभागाची एकूण तूट २१३२.५१ कोटी, तसेच आवश्यक किमान शिल्लक १ लाख रुपये मिळून २१३२.५२ रुपये एवढे अनुदान महापालिकेकडून अपेक्षित आहेत. बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या एकूण ५१० बसगाड्यांचे आर्युमान संपत असल्यामुळे त्या मोडीत काढून एकमजली विद्युत वातानुकूलित २७३ बसगाड्या व २३७ मिडी विद्युत वातानुकूलित बसगाड्या खरेदी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण परिवहन विभागाच्या भांडवली खर्चामधील तफावतीकरीता ६७९.५१ कोटी रुपये आवश्यक निधी मिळून २०२५-२६ या वर्षात एकूण २८१२.०३ कोटी रुपये एवढे महापालिकेकडून अपेक्षित अनुदान अर्थसंकल्पात दर्शविले आहे.

हेही वाचा – टाटा रुग्णालयाच्या इम्पॅक्ट संस्थेमुळे कर्करोगग्रस्त ८० टक्के मुलांना नवसंजीवनी, दरवर्षी जमा केला जातो ८० कोटी निधी

हेही वाचा – वाहनचालकांच्या ५६ जागांसाठी भरती, मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाच संधी

शून्य उत्सर्जन असलेली विद्युत बस वाढविणार

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील विद्युत बसची संख्या वाढविण्यात येणार आहे. बेस्टच्या ताफ्यात ३,१६६ बस असून यापैकी २,०८१ बस भाडे तत्वावरील आहेत. तर, २,१०० एक मजली विद्युत बस येणार असून यापैकी २०५ बस दाखल झाल्या आहेत. २०२६-२७ या वर्षात १०० टक्के शून्य उत्सर्जन बसताफा साध्य करण्यासाठी विद्युत बसगाड्यांचा ताफा ८ हजारपर्यंत वाढविणे हे बेस्टचे उद्दिष्ट आहे. यासह डिजिटल बस फलाट योजनेची अंमलबजावणी सुरू करण्याचे नियोजन आहे. याद्वारे स्वयंचलित प्रवासी भाडे आकारणी करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decision not to increase the price of best bus tickets mumbai print news ssb