मराठा समाजाला आरक्षण देऊन आपली ‘व्होट बँक’ पक्की करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रयत्नांना मंगळवारी सुरूंग लागला. या महत्त्वाच्या निर्णयासह अन्य काही ‘प्रलोभनीय’ निर्णय घेण्यासाठी मंगळवारी रात्री बोलावण्यात आलेली मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाली. त्यातच आज, बुधवारी सकाळीच लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार असून आचारसंहिताही लागू होणार आहे. त्यामुळे आता हा निर्णय लोकसभा निवडणुकांनंतरच होण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाला २० टक्के आरक्षण देण्याची शिफारस उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या समितीने केली होती. यावर मंगळवारी रात्री होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार होता. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बुधवारी सकाळी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होणार असल्याने व त्यासोबतच देशभर आचारसंहिता
लागू होणार आहे. अशा वेळी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला तरी, वटहुकूम काढणेही शक्य नाही. या पाश्र्वभूमीवर, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठकच रद्द करण्याचा निर्णय घेतला.

लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक आज
गेल्या वर्षभरापासून देशातील राजकारण ढवळून काढत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा आणि वेळापत्रकाची घोषणा बुधवारी सकाळी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात नवी दिल्लीत पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून, या तारखांबरोबरच देशात आचारसंहिताही लागू केली जाणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुका सहा-सात टप्प्यांत घेण्यात येण्याची शक्यता आहे.

नारायण राणेंनाही शह
‘मराठा समाजाला २० टक्के आरक्षण मिळवून देणारा अहवाल हे माझे आजवरचे सर्वात मोठे यश आहे’ असे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारीच कणकवली येथे झालेल्या एका कार्यक्रमात म्हटले होते. मात्र, या आरक्षणाबाबत मंगळवारी काहीच निर्णय न झाल्याने अहवालाबाबत श्रेय घेण्याच्या राणेंच्या प्रयत्नांनाही शह मिळाल्याचे बोलले जात आहे.

Story img Loader