मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्यांना मदत देण्याचा निर्णय एक आठवडय़ानंतर होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी यांनी नुकसानीचा अंदाज घेतला, तेव्हा ५० टक्के पंचनामे झाले होते. उर्वरित पंचनामे आठवडाभरात झाल्यावर मदतीचा निर्णय होईल. महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टी, चक्रीवादळग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेण्यास सात महिन्यांचा अवधी लावला आणि केंद्र सरकारकडे बोट दाखवत राहिले. आम्ही केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवू. पण केंद्राच्या निर्णयाची वाट न पाहता राज्याच्या निधीतून पूरग्रस्तांना व आपत्तीग्रस्तांना मदत दिली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते व खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपतींबाबत चौधरींसारख्या ज्येष्ठ नेत्याने केलेले वक्तव्य अनुचित आहे. त्यामुळे या समाजात आणि जगातही चुकीचा संदेश जातो, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.